(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Deepali Chavan Suicide Case : निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर
आरएफओ दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते.
Deepali Chavan Suicide Case : निलंबित मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास रेड्डी यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. आरएफओ दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी त्यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. स्वत:विरोधात कोणतेही पुरावे नसल्याचा दावा रेड्डी यांनी न्यायालयात केला.
आरएफओ दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या एका चिठ्ठीमध्ये रेड्डी यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्या आरोपांना केंद्रस्थानी ठेवत रेड्डींना अटकही करण्यात आली होती. पण, आता मात्र त्यांना जामीन मंजूर झाला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी दिपाली चव्हाण यांनी श्रीनिवास रेड्डी यांच्या नावे एक चार पानी पत्र लिहिलं होतं. यामध्ये त्यांनी अनेक खळबळजनक खुलासे केले होते. याच पत्राच्या आधारे काही दिवसांपूर्वी अमरावती पोलिसांनी कारवाई करत रेड्डी यांना ताब्यात घेत 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवलं होतं. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होतं. पण, अटकेच्या या कारवाईनंतर सदर घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा युक्तीवाद रेड्डींना मांडल्यानंतर त्यांना उच्च न्यायालयानं सशर्त अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
ABP Majha Exclusive : आत्महत्या करण्याआधी दीपाली चव्हाण यांचं पतीला भावनिक पत्र
पत्रात दिपाली चव्हाण यांनी नेमकं काय लिहिलं होतं?
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील गुगामल वन्यजीव विभागाच्या डॅशिंग महिला अधिकारी म्हणून ओळख असलेल्या दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती. या घटनेनंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात डीएफओ विनोद शिवकुमार या अधिकाऱ्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या दीपाली चव्हाण आणि डीएफओ विनोद शिवकुमार यांच्यामध्ये फोन वरून जो संवाद झाला त्याची ऑडिओ क्लिप समोर आली होती. दीपाली चव्हाण यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये, माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा असं लिहिलं होतं.
उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या तक्रार अर्जात म्हटलं होतं. हा तक्रार अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला होता. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला होता.