Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता
Mumbai Metro News :मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर दरम्यान धावणारी मेट्रो 2अ आणि दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व दरम्यान धावणारी मेट्रो 7 सुरू होण्याची शक्यता आहे.
![Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता mumbai metro news updates mumbai metro line 2a and metro line 7 may be open for passenger from march 2022 Mumbai Metro : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पुढील महिन्यापासून 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' धावण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/15/62aff3dd2d9703de1d30d5ef4b171a74_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Mumbai Metro News : मुंबईकरांची लवकरच वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. 'मेट्रो 2 अ' आणि 'मेट्रो 7' मार्ग लवकरच खुला होणार आहे. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली असून केवळ मेट्रो रुळांची सुरक्षा चाचणी शिल्लक आहे. या चाचणीनंतर मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मेट्रो सेवेत दाखल करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. ही प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होण्याची शक्यता असून मार्चमध्ये या दोन्ही मेट्रो सेवा कार्यरत होतील अशी शक्यता आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर वाहतूक कोंडीत किमान 10 ते 15 टक्क्यांनी घट होईल असे म्हटले जात आहे. त्याशिवाय लोकल ट्रेनमधील गर्दी कमी होण्याचा अंदाज आहे.
मेट्रोच्या या दोन्ही मार्गिकेसाठी जानेवारीत ‘रिसर्च डिझाईन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन’चे (आरडीएसओ) दर्जाविषयीचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. हे प्रमाणपत्र दोन टप्प्यांत मिळते. त्यानुसार मेट्रो गाडय़ांची सुरक्षा चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. आता केवळ रुळांची चाचणी शिल्लक आहे.
10 मेट्रो गाड्या आणि मनुष्यबळ सज्ज
‘मेट्रो 2 अ’ आणि ‘मेट्रो 7’च्या पहिल्या टप्प्यासाठी एकूण 10 मेट्रो गाडय़ा वापरण्यात येणार आहेत. या गाड्यांची चाचणी मागील कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. तर आता या गाड्यांची सुरक्षा चाचणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता या गाड्या प्रवासी क्षमतेसह धावण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. तर दुसरीकडे पहिल्या टप्प्यात मेट्रोचे व्यवस्थापन आणि मेट्रो चालविण्याची जबाबदारी एक स्वतंत्र यंत्रणेकडे सोपविण्यात आली आहे. एमएमआरडीएच्या आधिपत्याखाली असलेल्या या यंत्रणेने आवश्यक त्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले असून सेवा देण्यासाठी कर्मचारीवृंद सज्ज झाला आहे.
'मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- मुंबईकरांसाठी मोठी बातमी! एकाच कार्डवर बेस्ट, रेल्वे, मेट्रो प्रवास करता येणार
- BMC Election: निवडणूकीच्या सहा महिने आधी प्रभागांची फेररचना बेकायदेशीर, हायकोर्टात नव्यानं याचिका
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)