Mumbai Mega Block Updates : मुंबई लोकल संबंधित मोठी बातमी, आज अनेक मार्गांवर मेगाब्लॉक, जाणून घ्या
Mumbai Mega Block Updates : मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. जाणून घ्या या संबंधित सर्व माहिती.
Mumbai Mega Block Updates : लोकल रेल्वेला (Local Railway) मुंबईची लाईफ लाईन म्हणतात. लोकल ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आज रविवारी (31 जुलै) रेल्वेने अनेक मार्गांवर मेगाब्लॉक ठेवला आहे. हा मेगाब्लॉक हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेमध्ये ठेवण्यात आला आहे. तर सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.
या मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, रविवार, 31 जुलै रोजी विविध तांत्रिक कामांच्या दृष्टीने हार्बर, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि पश्चिम मार्गावरील बोरिवली-गोरेगाव दरम्यान मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गांवर मेगाब्लॉक नसल्याची माहिती रेल्वेने दिली आहे.
काही लोकल गाड्या आज रद्द
पश्चिम रेल्वेच्या बोरिवली ते गोरेगाव दरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर रविवारी सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक ठेवण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान या दोन स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर धावतील. तर काही लोकल गाड्या आज रद्द करण्यात आल्या आहेत. सीएसएमटी/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी 11.16 ते दुपारी 4.47 वाजेपर्यंत आणि वांद्रे/गोरेगाव येथून सकाळी 10.48 ते दुपारी 4.43 वाजेपर्यंत सुटणारी हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीसाठी सकाळी 9.53 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सीएसएमटीसाठी सकाळी 10.45 ते सायंकाळी 5.13 या वेळेत अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.
सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक
मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दरम्यानच्या दोन्ही मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी, वडाळा-वाशी, बेलापूर, पनवेल, वांद्रे, गोरेगाव दरम्यान अप-डाऊन लोकल धावणार नाहीत. मात्र, पनवेल-कुर्ला दरम्यान विशेष लोकल धावणार आहेत. सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत ठाणे-वाशी, नेरुळ अप-डाऊन येथेही मेगाब्लॉक राहणार आहे. मात्र, सीएसएमटी ते कल्याण या मुख्य मार्गावर मेगाब्लॉक टाकण्यात आलेला नाही.
पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष सेवा
ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. 8) दरम्यान 20 मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10.00 ते संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत मेनलाइन आणि पश्चिम रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी आहे. सीएसएमटी-कल्याण मुख्य मार्गावर मेगाब्लॉक असणार नाही.
बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान पाच तासांचा जंबो ब्लॉक
ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी 10.35 ते 3.35 वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जंबो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य रेल्वेच्या माहितीनुसार, ब्लॉक कालावधीत अप आणि डाऊन मार्गावरील सर्व स्लो गाड्या बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. ब्लॉक काळात काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. ब्लॉक कालावधीत बोरिवली स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1,2,3 आणि 4 वर कोणत्याही गाड्यांचे आगमन/निर्गमन होणार नाही.