एक्स्प्लोर
Mumbai Fire | मानखुर्दच्या झोपडपट्टीत भीषण आग, अनेक गोदामं जळून खाक
मानखुर्दच्या (Mumbai Mankhurd Fire) मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
मुंबई : मानखुर्दच्या मंडाला विभागात असलेल्या कुर्ला स्क्रॅप झोपडपट्टीला पुन्हा एकदा भीषण आग लागली आहे. या आगीत इथे असलेली अनेक गोदामे खाक झाली आहे. मंडला परिसरातील केमिकल, भंगारच्या गोदामांना आग लागली आहे. दरम्यान घटनास्थळी अग्निशामक दलाच्या आठ ते दहा गाड्या दाखल झाल्या आहेत. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
घाटकोपर मानखुर्द लिंक रोड पासून जवळच असलेल्या या झोपडपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात काळे तेल, साबण बनविण्याचे साहित्य, रद्दीअशी अनेक ज्वलनशील साहित्य असलेली गोदामे आहेत. त्यामुळे इथे वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत असतात.
आज सकाळी सहा वाजताच्या दरम्यान अशाच एक गोदामाला आग लागली आणि ही आग आजू बाजूच्या गोदामात पसरली. घटनेची माहिती मिळताच सुरुवातीला अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ज्या ठिकाणी ही आग लागली तिथून काहीच अंतरावर नागरिकांची वस्ती आहे. तिथं दाटीवाटीनं लोक राहतात. सकाळी मोठ्या प्रमाणात धूर झाल्यानंतर त्यांना आगीची माहिती मिळाली आणि ते लोक घराबाहेर पडले. सध्या कोरोनाची भीती आणि त्यात ही आग लागल्याने इथले लोक पुरते हादरुन गेले आहेत.
ही केमिकल आणि भंगारची गोदामं आहेत. या ठिकाणी अवैध धंदे चालतात, अशी माहिती नागरिकांनी एबीपी माझाशी बोलताना दिली. लोकवस्तीला लागूनच हे सुरु असल्यानं नागरिकांना त्याचा त्रास होतो. याबाबत पालिकेकडे तक्रार करुन देखील दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील नागरिकांनी केला आहे.
गेल्या काही वर्षात याच भागात वारंवार आग लागण्याचा घटना घडत असून इथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत गोदाम आणि अनधिकृत धंदे असून प्रशासन याकडे वारंवार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नेहमी स्थानिक करीत असतात. अजून तरी या आगीत कोणतीही जीवितहानी समोर आली नसली तरी आगीत अनेक गोदाम जळून खाक झाले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement