(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai Accident : भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीचा अपघात, दोन तरुणांचा जागेवरच मृत्यू, गोरेगावमधील घटना
Mumbai Accident News : भरधाव वेगाने जाणारी दुचाकी उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकली आणि तिथून 20 फूट खाली पडली. यामध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला.
Mumbai Accident : मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगाव पूर्व आणि पश्चिमला जोडणाऱ्या उड्डाणपुलावरून भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. उड्डाण पुलावरील संरक्षक कठड्याला धडकून दुचाकी थेट वीस फूट खोल खाली पडल्याने अपघात होऊन यात दोन तरुणांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. वैभव रामदास गमरे (28 वर्षे) आणि आनंद इंगळे (21 वर्षे) अशी मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. अपघाताची माहिती मुंबई पोलिसांना समजताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी झालेल्या वैभव आणि आनंद या दोघांनाही पोलिसांनी तातडीने जोगेश्वरीतील ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तिथे या दोघांनाही डॉक्टरांनी मृत घोषित केले.
याप्रकरणी गोरेगाव पोलिसांनी ADR दाखल करून घेतलं असून ही मुले दारूचे नशेत गाडी चालवत होते का किंवा कशामुळे हा अपघात झाला या संदर्भात अधिक तपास करत आहे.
परभणीच्या चारठाण्याजवळ क्रूझरच्या अपघातात 2 ठार 12 जण जखमी
परभणीच्या जिंतूर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील चारठाणा परिसरातील वळण रस्त्यावर क्रुझर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने वाहन पलटी खात रस्त्याच्या बाजूला खड्ड्यात गेल्याने अपघात होऊन या जीपमधील दोन जण जागीच ठार झाले तर बारा जण गंभीर जखमी झाले.यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कनका या गावातील भाविक एम.एच.22,यु 4352 या क्रमांकाच्या क्रूझर जीपने शिर्डी येथे साईबाबाच्या दर्शनाला गेले होते. दर्शन करून गावी परतत असताना आज चारठाणा गावाजवळील एका वळण रस्त्यावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने क्रुझर अनेक पलट्या खात रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जावून आदळली. जीपमधील रुक्मिनी चंदू चाभाडे (वय 35 वर्ष) व दिपक सखाराम जाधव (वय 36 वर्ष) हे जागीच ठार झाले.तर इतर बारा भाविक जखमी झाले.
अपघातानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभाकर कापुरे यांच्यासह टीमने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्ण वाहिकेतून जिंतुर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. जिंतुर येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले असून यातील तिन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे.
ही बातमी वाचा: