Mumbai Ganesh Visarjan 2024: मुंबईतील सार्वजनिक गणपती मंडळांसाठी महत्त्वाची बातमी, रात्री 11 वाजता समुद्राला मोठी भरती
Mumbai Ganpati Visarjan 2024: लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ म्हणजेच, गणेशगल्लीचा गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. गणपती मंडळांसमोर अडचण
मुंबई: तमाम महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत असलेला गणपती बाप्पा 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर मंगळवारी विसर्जनासाठी निघणार आहे. मुंबईत घरगुती गणपतींसह सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तीचे थाटामाटात मिरवणुका काढून विसर्जन केले जाणार आहे. मुंबईतील बहुतांश बड्या मंडळांच्या गणपतीचे (Mumbai Ganesh Idols) विसर्जन गिरगाव चौपाटीवर केले होते. हे विसर्जन दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरु असते. मात्र, यंदा मुंबईतील गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जन (Ganesh Visarjan 2024) लवकर होण्याची शक्यता आहे. कारण मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास समुद्राला मोठी भरती येणार आहे. ही भरती बराच काळ राहील. त्यामुळे या काळात समुद्रात जाणे धोक्याचे ठरेल.
लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि काही मोजके गणपती विसर्जनासाठी तराफ्यावर ठेवून खोल समुद्रात नेले जातात. मात्र, अन्य मंडळांचे कार्यकर्ते गणपतीची मूर्ती उचलून विसर्जनासाठी समुद्रात नेतात. समुद्रात मोठी भरती आल्यास विसर्जन करणे शक्य होणार नाही. त्यामुळे अनेक सार्वजनिक मंडळे रात्री 11 पूर्वी गणेशमूर्तीचे विसर्जन करु शकतात. खेतवाडीच्या राजाचे विसर्जनही यंदा लवकर होण्याची शक्यता आहे.
समुद्रकिनाऱ्यावर जेली फिशचा वावर, भाविकांना काळजी घेण्याचे आवाहन
समुद्रकिनाऱ्यावर दंश करणारे मासे तसेच समुद्री जीवांचे अस्तित्व राज्याच्या मत्स्यविकास विभागाच्या पाहणीत आढळले आहे. त्यामुळे गणेशमूर्तीचे समुद्रात विसर्जन करताना नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे. राज्य सरकारच्या मत्स्य व्यवसाय विभागाने गिरगाव आणि दादर चौपाटी येथे अपायकारक माशांच्या अस्तित्वाची चाचपणी केली असता त्यात ढोमी, कोळंबी, स्टिंग रे (पाकट), जेली फिश, शिंगटी, ब्लू जेली फिश, घोडा मासा, छोटे रावस आदी मासे आढळले आहेत. नेटिंगमध्ये पाकट (स्टिंग रे) हा मासा आढळला. त्याचबरोबर जेली फीश, ब्लू जेली फिश हे मासेही आढळले. त्यामुळे विसर्जनावेळी भाविकांना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईचा राजा विसर्जनासाठी निघाला
मुंबईचा राजा अशी ख्याती असलेला गणेशगल्लीचा गणपती सकाळी साडेआठ वाजता विसर्जनासाठी मंडपातून निघाला आहे. आता हा गणपती संध्याकाळपर्यंत गिरगाव चौपाटीवर पोहोचेल. त्यापूर्वी मुंबईचा राजाची जंगी मिरवणूक निघणार आहे. या मिरवणुकीसाठी लालबाग परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. मुंबईची राजा विसर्जनाला मार्गस्थ झाल्यानंतर आता इतर सार्वजनिक मंडळांचे गणपती एक-एक करुन मंडपातून निघतील.
आणखी वाचा