Sakinaka Fire : मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नितांडव, दोन कामगारांचा मृत्यू
Sakinaka Fire : मुंबईतील अंधेरी परिसरात साकीनाका इथे दुकानाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते.
Sakinaka Fire : मुंबईतील (Mumbai) अंधेरी परिसरात साकीनाका (Sakinaka) इथे दुकानाला लागलेल्या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. हे दोघेही हार्डवेअर दुकानातील कामगार होते. राकेश गुप्ता (वय 22 वर्ष )आणि गणेश देवासी अशी मृतांची नावं आहेत. आग लागली तेव्हा दुकानात अकरा कामगार झोपले होते. त्यापैकी नऊ कामगारांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले तर दोघे अडकले होते. यात या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. दरम्यान आगीवर नियंत्रण मिळवले असून अजूनही कुलिंग ऑपरेशन सुरु आहे.
आधी आग विझली, पुन्हा भडकली
साकीनाका भागात आज पहाटे दोनच्या सुमारास हार्डवेअरच्या दुकानाला आग (Fire) लागली. या आगीत हार्डवेअरचं आणि त्याच्या शेजारचं दुकान जळून खाक झालं. ही दुकानं साकीनाका मेट्रो स्टेशनच्या जवळच होती. राज श्री असं या दुकानाचं नाव आहे. ही आग एवढी भीषण होती की दूरपर्यंत आगीचे लोळ दिसत होते. आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी त्या ठिकाणी पोहचले. त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली. त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली. यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं असून कुलिंगचे काम सध्या सुरु आहे.
लेव्हल 1 ची आग
या आगीमुळे संपूर्ण साकीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात धूर झाला होता. मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 असल्याचं घोषित केलं होतं. अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवत दुकानात प्रवेश केला असता 22 वर्षीय राकेश गुप्ता भाजलेल्या अवस्थेत सापडला. त्याला राजावाडी रुग्णालयात नेलं असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. तर दुकानात अडकलेला गणेश देवासी बेपत्ता होता. काही वेळाने त्याचाही मृतदेह सापडला.
दुकानाचं मोठं नुकसान
दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचं म्हटलं जात आहे. या आगीत दुकानाचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती. दोन मचान असलेल्या दुकानात इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे. अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, दुकानाच्या आतील मचान कोसळलं. परिणामी दुकानात प्रवेश करण्यास अडचण निर्माण झाली होती. त्यानंतर दुकानाचा पुढील भाग जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यात आला.
हेही पाहा