Mumbai : मुंबईत वीजेची मागणी वाढली, विद्युत महामंडळाने गेमचेंजर निर्णय घेतला अन् एका झटक्यात 2000 मेगावॅटने 'पॉवर' वाढली
Mumbai : दोन विद्युत वाहिन्या एकत्र करुन विक्रमी वेळेत नुकतंच हे काम पूर्ण झालं आहे. दोन वाहिन्या मिळून 2000 मेगावॅटऐवजी 4 हजार 200 मेगावॅट इतक्या विजेचे वहन आता शक्य होणार आहे.
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषणच्या 400 के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. 1 चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीकडून (महापारेषण) अवघ्या 17 दिवसांत पूर्ण झाले आहे. 500 पेक्षा अधिक कुशल कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने विक्रमी वेळेत नुकतेच हे काम पूर्ण झाले. यामुळे वाहिनी क्र. 1 आणि वाहिनी क्र. 2 या दोन्ही वाहिन्या मिळून 2000 मेगावॅटऐवजी 4 हजार 200 मेगावॅट इतक्या विजेचे आता वहन करणे शक्य होणार आहे.
या वाहिनीचे यापूर्वीच 27 कि.मी. चे काम 2023-24 मध्ये पूर्ण झाले होते. उर्वरित 23 कि.मी. चे काम महापारेषणने युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे नियोजन केले. या वाहिनीच्या कामात रेल्वे, हायवे आणि उच्च विदयुत वाहिन्यांचे क्रॉसिंग, डोंगराळ भाग, वनजमीन तसेच ठिकठिकाणी स्थानिक ग्रामस्थांचा विरोध यासारखी मोठी आव्हाने होती. परंतु, या सर्व अडचणींवर मात करून महापारेषणने या वाहिनीच्या कामात गतीशीलता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व विविध भागधारकांशी सकारात्मक सुसंवाद साधून 23 कि.मी. चे वरील काम तातडीने पूर्ण केले.
या कामामुळे 400 के.व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-1 च्या क्षमतेत आमुलाग्र बदल होऊन पूर्वीच्या 1000 मेगावॅटऐवजी 2100 मेगावॅटपर्यंत विजेचे वहन करणे शक्य होणार आहे. यापूर्वीही कळवा-पडघा वाहिनी क्रमांक-2 च्या क्षमतेत वाढ झाल्याने दोन्ही वाहिन्या मिळून 2000 मेगावॅटऐवजी 4 हजार 200 मेगावॅट इतक्या विजेचे वहन करणे आता शक्य होणार आहे.
हे काम यशस्वी करण्यासाठी महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली संचालक (संचलन) श्री. सतीश चव्हाण व वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री. महेश भागवत यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
या कामाचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यासाठी कळवा मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. विजय आवारे, कार्यकारी अभियंता श्री. संतोष भुजबळ, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सुखदेव पनवार यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. तसेच यासाठी मेसर्स अपार इंडस्ट्रिज लिमिटेड यांचेही मोलाचे योगदान लाभले.
हेही वाचा: