Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या ITI मध्ये मिळणार ‘वैदिक संस्कारा’चे धडे, त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांचा कडाडून विरोध; नेमकं प्रकरण काय?
Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या आयटीआय कॉलेजमध्ये आता वैदिक संस्कारांचे धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Nashik ITI Vedic Sanskar: नाशिकच्या आयटीआय (औद्योगिक प्रशिक्षण संस्था) कॉलेजमध्ये पारंपरिक शिक्षणासोबत आता वैदिक संस्कारांचे (Vedic Sanskar) धडे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. "वैदिक संस्कार ज्युनिअर असिस्टंट" हा नवीन अल्पमुदतीचा रोजगारक्षम अभ्यासक्रम लवकरच सुरु होणार असून, त्यामुळे स्थानिक पातळीवर मोठा वाद निर्माण झाला आहे.
नाशिक हे कुंभमेळ्याचे केंद्रस्थान असल्याने त्यावेळी दैनिक धार्मिक विधी, पूजा, संस्कारांसाठी हजारोंच्या संख्येने पुरोहितांची गरज भासते. ही गरज लक्षात घेता आयटीआयतर्फे विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार, धार्मिक विधी, पूजा-पाठ याचे प्रशिक्षण देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या उपक्रमाचा उद्देश आधुनिक तंत्रशिक्षणासोबतच भारतीय संस्कृती आणि अध्यात्म यांचा संगम घडवणे असा सांगितला जातो आहे. मात्र याला नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या स्थानिक पुरोहितांसह त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांकडून कडाडून विरोध करण्यात आला आहे.
Nashik ITI Vedic Sanskar: सरकारने कोणता अट्टहास करायचं ठरवलंय?
याबाबत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्त कैलास घुले म्हणाले की, आगामी कुंभमेळ्यासाठी पौरोहित्य करण्यासाठी आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही घटना अतिशय चुकीची आहे. हिंदू धर्माच्या रूढी, परंपरेला छेद देणारी आहे. महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय शिकवला जातो, त्याला व्यवसायाचा स्वरूप देऊन असा कोणता अट्टहास सरकारने करायचा ठरवलेला आहे? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
Nashik ITI Vedic Sanskar: त्यांना पौरोहित्य करू देणार आहात का?
कैलास घुले पुढे म्हणाले की, पौरोहित्य व्यवसायाचे शिक्षण देऊन सर्वांसाठी हे दालन खुलं करण्यात येत आहे. या गोष्टीला परंपरा आहेत, रूढी आहेत. तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे. आपले कोणतेही पूर्वज तीर्थयात्रेला गेले तर तिथल्या गुरुजींकडे जाऊन पूजा विधी केली जाते. परंतु, अशा प्रकारे त्याला व्यवसायाचे स्वरूप देऊन सरकारने अभ्यासक्रम आणलेला आहे. याला आमचा पूर्ण विरोध आहे. यात उद्या इतर धर्मीय नागरिकांनी या शिक्षणक्रमात प्रवेश मिळण्याचा अट्टाहास केला तर तुम्ही त्यांना पौरोहित्य करू देणार आहात का? हा माझा सरकारला सवाल आहे. चुकीच्या संकल्पनेवर आधारित शिक्षण पद्धती सरकारने आणू घातलेली आहे, असे म्हणत कैलास घुले यांनी सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध केलाय.
आणखी वाचा
























