Mumbai Crime News: खळबळजनक...! उल्हासनगरमध्ये 20 रुपयांसाठी एका तरुणाची हत्या, आरोपीला बेड्या
20 रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प पाचच्या जय जनता कॉलनी परिसरात घडली आहे.
कल्याण : 20 रुपये देण्यास नकार दिल्याने एका तरुणाची निर्घृण हत्या झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास उल्हासनगर कॅम्प पाचच्या जय जनता कॉलनी परिसरात घडली आहे. अनिल आहुजा असं हत्या झालेल्या इसमाचं नाव आहे. या प्रकरणी आरोपी साहिल मैराळे याला हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. मृत अनिल हा चहाच्या दुकानावर कामाला होता. तो कुटुंबासोबत तो जय जनता कॉलनी परिसरात राहत होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिल आहुजा यांच्याकडे नशेबाज साहिल मैराळे याने काही दिवसंपूर्वी 20 रुपये मागितले होते. अनिलने पैसे देण्यास नकार दिल्याने साहिलला राग आला. रविवारी रात्रीच्या सुमारास दारुच्या नशेत असलेला आरोपी साहिल मैराळे हा जय जनता कॉलनी मधील एका गल्लीत गांजा पिण्यासाठी बसला होता. रस्त्याने जाणाऱ्या अनिलकडे त्याचे लक्ष गेले पैसे न दिल्याच्या रागातून साहिल याने त्याच्या कमरेला असलेला चाकू काढून अनिल वर सपासप वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अनिलला तात्काळ मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी मयत घोषित केले. या घटनेने नंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. हिललाईन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. अवघ्या 2 तासात आरोपी साहिल याला कॅम्प 4 च्या सर्टिफाईट ग्राउंड जवळून ताब्यात घेत अटक केली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.