Mumbai Crime News: नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडला! ट्रेनने कुर्ल्यात उतरला, अन् घात झाला, 9 वर्षाच्या मुलावर अत्याचार करून तोंड जमिनीत दाबलं, अंगावर मारहाणीच्या खूणा
Mumbai Crime News: नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेल्या नऊ वर्षांचा मुलगा ट्रेनने कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये उतरला. रेल्वे ब्रिजवरून एकटा फिरत असलेल्या मुलावरती एका विकृताची नजर पडली.

मुंबई: राज्यभरात गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. यामुळे महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांसोबतच आता लहान मुलं देखील सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित झाला आहे. चुनाभट्टी परिसरामध्ये एका मुलावरती अनैसर्गिक अत्याचार करून त्याचा निर्घृणपणे खून केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. नैसर्गिक विधीसाठी घराबाहेर पडलेल्या नऊ वर्षांचा मुलगा ट्रेनने कुर्ला रेल्वे स्थानकामध्ये उतरला. रेल्वे ब्रिजवरून एकटा फिरत असलेल्या मुलावरती एका विकृताची नजर पडली, आणि त्या चिमुकल्याचा अत्याचार करून जीव घेतला.
खाऊचे आमिष दाखवत नराधम आरोपीने मुलाला निर्जनस्थळी नेले. तेथे त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केले आणि हे घडत असताना मुलगा ओरडत होता, मदतीसाठी ओरडत असताना नराधम आरोपीने त्याचा चेहरा जमिनीवर मातीत दाबून त्याची निघृण हत्या केली. याप्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवत चुनाभट्टी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने मोहम्मद सलमान अनुसरूल हक (वय वर्षे 19) आरोपीला अटक करण्यात आलेली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारावी परिसरामध्ये आई वडील आणि चार भावंडांसोबत चिमुकला राहत होता. बुधवारी रात्री नैसर्गिक विधीसाठी सांगून तो घराबाहेर पडला. फिरत फिरत त्यानं स्टेशन गाठलं. तेथून ट्रेनने कुर्ला स्थानकात उतरला. ब्रिजवर भटकत असताना बिहारच्या हकची नजर त्याच्यावर गेली. त्याने खाऊचं आणि पैशांचे आमिष देत त्या चिमुकल्याला सोबत नेलं. गप्पा मारत कुर्ला पूर्वेकडील स्वदेशी मिल रोड येथील निर्जनस्थळी गेले. तेथे मुलावर अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाने त्याला विरोध करताच त्याला मारहाण केली. त्याचा गळा दाबून चेहरा मातीत दाबण्याचा प्रयत्न केला. शेवटी ताकद कमी पडली, मुलाने प्राण सोडले. आरोपीने त्याला तेथेच सोडून पळ काढला. रात्री उशिराने मुलाबाबत माहिती मिळताच चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासाला सुरूवात केली.
कसा घेतला शोध?
मुलगा बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. त्यात, मृतदेह हाती लागल्याने पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू केला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला बुधवारी रात्री उशिराने अटक केली. आरोपी हक हा मूळचा बिहारमधील मोधापूर, चंपाचा रहिवासी आहे. तो सध्या ठाण्यातील भिवंडी परिसरात राहत होता. आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यात येत असल्याचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी सांगितले आहे
मुलाच्या अंगावर जखमा, हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण
मृत मुलाचा मृतदेह सापडल्यानंतर चुनाभट्टी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलाला सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं. येथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मुलाच्या संपूर्ण अंगावर जखमा असून, आरोपीने मुलाची हत्या करण्यापूर्वी त्याला मारहाण करून हत्या केल्याचंं समोर आलं. मुलगा धारावीतील असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी त्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली.



















