(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबईमध्ये 1कोटी 40लाखांचे ड्रग्ज जप्त, 4 आरोपी गजाआड, मुंबई गुन्हे शाखेची कारवाई
अटक करण्यात आलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपी परदेशी नागरिक असून ड्रग्सचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि स्थानिक माहिती गोळा केली. या सर्वांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावाण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईमध्ये 1कोटी 40लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेने ही कारवाई केली असून या प्रकरणी चौघांना अटक केली आहे. यांची नावं दीनानाथ उर्फ टुनटून रंगनाथ चौहान (33), फ्लूग्नस उर्फ रोलन्स उर्फ मुस्तफा लाऊड आका (31), जेरमेन जेरी (29), सन्नी साहू (34) अशी असून फ्लूग्सन आणि जेरमेन जेरी हे आईव्हरी कोस्ट देशाचे नागरिक आहेत. सन्नी साहू या टोळीचा प्रमुख होता.
गून्हे शाखा 11 चे प्रधान पोलिस निरीक्षक सुनील माने यांना माहिती मिळाली की मेफेड्रॉन (एम डी) हे अमली पदार्थ विकण्यासाठी 2 परदेशी नागरिक खजुरीया नगर कांदिवली येथे येणार आहेत. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल भोसले यांच्या नेतृत्वाखाली एक पथक नेमण्यात आलं. मिळालेल्या माहितीची शहानिशा करून क्राइम ब्रांचच पथक कांदिवली येथील खजुरिया नगर येथे सज्ज झालं. ऑटोरिक्षामधून दोन इसम आले आणि काही वेळाने ऍक्टिवा मोटर सायकल वरून दोन परदेशी आले. परदेशी नागरिक रिक्षामध्ये असलेल्या दोन इसमांना पॅकेट देताना क्राइम ब्रांचच्या नजरेत आले. क्राईम ब्रँचला त्यांच्या हालचालींवर संशय आला. त्यानंतर क्राईम ब्रांचच्या पथकाने त्या इसमांच्या चारही बाजूने घेराव घालून त्यांना ताब्यात घेतलं. त्यांच्याकडून क्राईम ब्रांचला 700 ग्राम एमडी मिळून आलं ज्याची किंमत 1 कोटी 40 लाख रुपये इतकी आहे.
विशेष म्हणजे अटक करण्यात आलेले दोन्ही परदेशी नागरिक ड्रग्सचा व्यवसाय करण्यासाठी हिंदी शिकले आणि स्थानिक माहिती गोळा केली. या सर्वांना 18 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावाण्यात आली आहे. ही टोळी ड्रग्स कुठे विकायची आणि कुठून आणायची आता याचा तपास क्राइम ब्रांचकडून केला जात आहे.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रभारी पोलिस निरीक्षक सुनील माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील भोसले, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झीने, विशाल पाटील, नितीन उत्तेकर, पोलीस उप निरीक्षक सुधीर कोरगावकर, तानाजी पाटील पोलीस अमलदार रवींद्र भांबीड, नितीन शिंदे,दिलीप वाघरे,संतोष माने,सुबोध सावंत, सत्यनारायण नाईक, विनायक साळुंखे, राजेश चव्हाण,महादेव नावगे, राकेश लोटणकर, सचिन कदम, जयेश केनी, अजित चव्हाण, अजय कदम, सचिन आवळे, निलेश शिंदे, महेश रावराणे, सारिका कदम, रिया अनेराव चालक उपेंद्र मोरे,प्रशांत ढगे या पथका द्वारे करण्यात आली.