परदेशात जाणारे बेडशीट चोरून पाठवले दगड गोटे! टोळीचा पर्दाफाश, अडीच कोटींचा माल जप्त
अडीच कोटींच्या बेडशीटचा माल लंपास करून त्याजागी दगड गोटे कंटेनरमध्ये भरून परदेशात पाठवणाऱ्या प्रकाराने पोलीस देखील चक्रावले आहेत. भिवंडीत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
भिवंडी : परदेशात पाठवण्यात येणाऱ्या उच्च दर्जाच्या बेडशीटची चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत भिवंडी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. सर्फराज अन्सारी ,मो.फारुख कुरेशी, मो.रिहान कुरेशी व मो.मूल्तजीम कुरेशी असे अटक आरोपींची नावे आहेत. या टोळीने भिवंडीतील NMK टेक्स टाईल मिल्स नावाची कंपनी व मुंबईतील ग्लोब कॉटयार्न या दोन कंपनीला अडीच कोटीचा चुना लावला होता. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 1 कोटींचा 92 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. ही टोळी बड्या शिताफीने सील बंद कंटेनर मधील माल लंपास करून त्या जागी दगड गोटे भरून परदेशात निर्यात करायची.
पहिल्या गुन्ह्यात भिवंडीच्या काल्हेरमध्ये NMK टेक्स टाईल मिल्स नावाची कंपनी आहे. या कंपनीला शिकागो आणि कॅनडा इथल्या परदेशी कंपन्यांकडून बेडशीट मालाची ऑर्डर मिळाली होती. मिळालेल्या ऑर्डर प्रमाणे माल तयार करून सदरील माल न्हावाशेवा पोर्ट इथे पाठवण्याकरता सीबर्ड एजन्सी मार्फत ओम साई लॉजिस्टिक ट्रेलरद्वारे सीलबंद कंटेनरमध्ये भरून पाठवण्यात आला. परंतु सदरचा कंटेनर परदेशातील संबंधित कंपन्यांकडे पोहोचल्यावर तपासले असता, यात सीलबंद कंटेनरमधून एकूण 1 कोटी 27 लाख रुपये किमतीचे बेडशीटची चोरी झाल्याची माहिती लक्षात आली. कंटेनरमध्ये दगड गोटे आढळून आले.
तर दुसऱ्या गुन्ह्यात मुंबईतल्या अंधेरी येथील ग्लोब कॉटयार्न कंपनीला देखील चुना लावण्यात आलाय. या कंपनीला इलाईट होम प्रॉडक्ट या अमेरिकन कंपनीकडून बेडशीट मालाची ऑर्डर मिळाली होती. ऑर्डरप्रमाणे माल तयार करून सदरील माल नाव्हाशेवा येथे पाठवण्यात आला परंतु परदेशातल्या संबंधित कंपनीकडे माल पोहोचल्यानंतर सीलबंद कंटेनरमधून 1 कोटी 15 लाख रुपये किमतीचे बेडशीट चोरी झाल्याचं समजून आलं आणि या कंटेनरमधील माल चोरी करून कंटेनरमध्ये दगड परदेशात पाठवण्यात आले होते .
या दोन्ही गुन्ह्यात आरोपींनी परदेशात कंटेनरमधून दगड गोटे पाठवले, दरम्यान नारपोली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चारही आरोपींना उत्तरप्रदेशमधून अटक केली आहे. चारही आरोपींची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही टोळी तीन महिन्याआधी प्लॅनिंग करून उत्तर प्रदेशातून चालकांना बोलावून त्यांना एखाद्या ट्रान्सपोर्टमध्ये काम लावत असे. त्यानंतर तीन महिने रेकी केल्यानंतरपूर्ण कंटेनर मालासह लंपास करत. या कंटेनरमधील माल खाली करून यामध्ये दगड-गोटे भरून परदेशात पाठवून देत असे. या संपूर्ण गुन्ह्यांचा उलगडा नारपोली पोलिसांनी केलाय. अडीच कोटींच्या बेडशीटचा माल लंपास करून त्याजागी दगड गोटे कंटेनरमध्ये भरून परदेशात पाठवणाऱ्या प्रकाराने पोलीस देखील चक्रावले आहेत.