(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाळेतील शिक्षिकेची हत्या करून मारेकऱ्याचीही आत्महत्या; मुंबईतील घटना
शाळेतील शिक्षिकेची हत्या करून मारेकऱ्यानेही आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. धक्कादायक प्रकारामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
मुंबई : भांडुपच्या उच्चभ्रू वक्रतुंड पॅलेस इमारतीत सोमवारी सकाळी धक्कादायक प्रकार घडला. एका शाळेतील शिक्षिकेची हत्या करून मारेकऱ्यानेही आत्महत्या केल्याची घटना सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. यास्मिता साळुंखे (37) असं मृत शिक्षिकेचे नाव असून, किशोर सावंत असं आरोपीचं नाव आहे. भांडुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून सदर प्रकरणी भांडुप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास शिक्षिका यास्मिता साळुंखे यांच्या डोक्यात हातोडा मारून त्यांची हत्या करण्यात आली. तसेच हत्या करून पळून गेलेला आरोपी किशोर सावंत यानेदेखील आत्महत्या केली आहे. किशोर सावंत हा इस्टेट एजंटअसून त्याची आणि अस्मिता यांची ओळख होती. परंतु, या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. हत्येनंतर आरोपी कल्पतरू येथील त्याच्या घरी गेला होता. गंभीर जखमी झालेल्या यास्मिता यांना रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, दाखल करण्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच मारेकऱ्याचा पाठलाग केला. पोलीस आपल्या मागावर आहेत हे समजताच किशोर सावंत याने इमारतीवरून उडी मारत आत्महत्या केली. भांडुप पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.
भांडूपमधील यास्मिता साळुंखे हत्या प्रकरणाबाबत यास्मिता यांचे मोठे बंधू मिलिंद बडगुजर यांनी धक्कादायक दावा केला आहे. यशमिता यांचा खून त्यांच्या सासरच्या लोकांनी केल्याचा आरोप बडगुजर यांनी केला आहे. मागील एका महिन्यांत यास्मिता यांचे पती मिलिंद साळुंखे आणि त्यांच्या कुटुंबांविरोधात 3 तक्रारी आम्ही भांडूप पोलीस ठाण्यात दाखल केल्याची माहिती बडगुजर यांनी दिली आहे. जर पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर आज आम्हांला हा दिवस पहावा लागला नसता, अशी प्रतिक्रिया बडगुजर यांनी दिली आहे. दरम्यान पोलिसांनी जाहीर केलेल्या प्रेसनोटनुसार किशोर सावंत नावाच्या एका इस्टेट एजंटने यास्मिता यांची डोक्यात हातोडा मारून हत्या करून स्वतः देखील आत्महत्या केल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, किशोर हा इस्टेस्ट एजंट होता व साळुंखे यांच्या परिचयातील होता. यास्मिता यांच्या हत्येत त्याचा हात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. शोध सुरू असतानाच भांडुपमधील कल्पतरू टॉवरवरून एकाने उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तो किशोरच होता. मात्र, त्याने यास्मिता यांची हत्या का केली आणि त्यानंतर आत्महत्या का केली यामागचे नेमके कारण समजू शकले नाही.
संबंधित बातम्या :
मुंबई विद्यापीठाचे थिएटर ऑफ अर्ट्सचे संचालक योगेश सोमण सक्तीच्या रजेवर
मुंबई, ठाण्यासह कल्याण, डोंबिवली, भिवंडी, अंबरनाथ, बदलापूरवासियांसाठी खुषखबर