अधिकारी दोषी आढळल्यास कारवाई करणार; 'माझा'च्या प्रतिनिधीला धक्काबुक्कीप्रकरणी मुंबई पोलीस आयुक्तांचं आश्वासन
पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून माध्यम प्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं की, काल जी घटना घडली ती घडायला नको होती.
मुंबई : प्रसिद्ध सार्वजनिक गणपती मंडळ लालबागचा राजा मंडप परिसरात काल वार्तांकनासाठी गेलेल्या एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांना पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून धक्काबुक्की करण्यात आली आहे. या घटनेचा सर्वच स्थरातून निषेध नोंदवला जात होता आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई मागणीही केली जात होती. आता मुंबईची पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी देखील या घटनेवर भाष्य केलं आहे.
पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्याकडून माध्यम प्रतिनिधींना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी म्हटलं की, काल जी घटना घडली ती घडायला नको होती. आम्ही यासंदर्भात जबाब नोंदवत आहोत. तपासात जर संबंधित अधिकारी दोषी आढळला तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन हेमंत नगराळे यांनी दिलं.
काय आहे प्रकरण?
लालबागचा राजा मंडळ परिसरात रिपोर्टिंगसाठी गेलेल्या प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडे पत्रकारांकडे असणारे लालबागच्या राजाच्या मंडळाने दिलेले प्रवेशाचे अधिकृक पास असताना देखील पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी मंडपामध्ये जाण्यापासून त्यांना रोखलं. आपण पत्रकार आहोत आणि वार्तांकन करत आहोत हे सांगितलं आणि ओळखपत्र दाखवलं तरीही निकम यांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि अरेरावीची भाषाही वापरली. या वेळी प्रतिनिधींनी हात लावू नका असं देखील त्यांना बजावलं. त्यावेळी अधिकाऱ्याने हात काय पाय सुद्धा लावून दाखवतो अशी गुंडागिरीची भाषा वापरली होती. निकम यांनी यावेळी मास्क देखील लावला नव्हता.
एबीपी माझाचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांची प्रतिक्रिया
लालबागच्या कव्हरेजसाठी आम्ही सगळ्यांनी नियमानुसार पास काढले होते. पण पास असूनही सकाळपासूनच पोलिसांनी आत जाण्याची परवानगी दिली नाही. तरीही आम्ही अधिकाऱ्यांशी विनंती करून आतमध्ये जाण्याच्या प्रयत्न करत होतो. महिला पत्रकारांना देखील उद्धट वागणूक देण्यात आली. पास असून देखील अडवण्यात आले. पोलिसांकडून अक्षरश: गुंडागिरी केली जात आहे, असे अभिषेक मुठाळ म्हणाले. जेव्हा दादर परिसरात गर्दी होते. कोरोना नियम अक्षरश: पायंदळी तुडवले जातात त्यावेळी मुंबई पोलिस शांत का असतात? असा सवाल देखील त्यांनी या वेळी उपस्थित केला. एका पोलीस अधिकाऱ्याच्या अरेरावीमुळे संपूर्ण मुंबई पोलिस बदनाम होत असल्याचं देखील अभिषेक यांनी म्हटले.