(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Protest :मुंबईत काँग्रेसचं भाजपविरोधात आंदोलन; वडेट्टीवार, वर्षा गायकवाड आंदोलनात सहभागी
Congress Protest : राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह फोटो शेअर केल्यानंतर भाजपविरोधात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले आहे.
मुंबई : मुंबई प्रदेश काँग्रेसकडून (Congress) भाजपविरोधात आंदोलन करण्यात आले आहे. दरम्यान या आंदोलनावेळी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस आमने-सामने आलेत. या आंदोलनामध्ये विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), वर्षा गायकवाड सहभागी झालेत. भाजपकडून राहुल गांधी यांचा आक्षेपार्ह एक फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. त्याच निषेधार्थ मुंबई काँग्रेसकडून भाजपविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
या आंदोलनावेळी काँग्रेसकडून पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. भाजपकडून राहुल गांधी यांचा रावणाच्या वेशातील फोटो शेअर करण्यात आला होता. त्याच विरोधात काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागलं. मुंबईतील आझाद मैदानाच्या शेजारी असलेल्या मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात आंदोलन करण्यात आलं आहे.
जे काही होईल त्याला केंद्र सरकार जबाबदार - वडेट्टीवार
दरम्यान केंद्रातील सरकारमुळे रावणराज्य आल्याचं म्हणत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं की, 'आपल्या देशात सीतेचा रोज अपमान होतो. महिलांवर अत्याचार होतात. याकडे सरकारचं लक्ष नाही. त्यांच्यामुळे आज आपल्या देशात रावणराज्य आहे. जर रावण कोणी असले तर ते केंद्र सरकार आहे. गांधी नावाची दहशत यांच्या मनात निर्माण झालीये. त्यामुळे राहुल गांधींवर निशाणा साधण्यात येत आहे. पण जर भाजपकडून असं करण्यात आलं, तर याचे जे काही परिणाम होतील त्याला पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार राहिल.'
नेमकं प्रकरण काय?
भाजपकडून राहुल गांधी यांचा मॉर्ब केलेला रावणाच्या वेशातील फोटो शेअर करण्यात आला होता. त्यानंतर काँग्रेसकडून आक्रमकतेची भूमिका घेण्यात आली होती. दरम्यान त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत काँँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळाल. तर संपूर्णदेशभरात काँग्रेसकडून भाजपच्या या पोस्ट विरोधात संताप व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनावेळी पोलिसांमध्ये आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांकडून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची अडवणूक देखील करण्यात आली. तर यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर देखील कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले होते. दरम्यान भाजपविरोधात काँग्रेसकडून ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात येत आहेत. त्यामुळे आता यावर भाजपकडून कोणती भूमिका घेण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.