Mumbai Vaccine : मुंबईत 100 टक्के नागरिकांना कोरोनाचा पहिला डोस, आता पूर्ण लसीकरणाचं ध्येय
BMC Vaccination : मुंबईमध्ये एकूण दीड कोटी नागरिकांना कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस देण्यात आला आहे. येत्या काळात सर्व नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याचं ध्येय प्रशासनाने ठेवलं आहे.
मुंबई : शहरात लसीकरणाने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मुंबईत आज कोरोना लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुंबईत शुक्रवारपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचं 99.99 टक्के लसीकरण पूर्ण झाले होते, ते आज 100 टक्के पूर्ण झाले आहे. मुंबईत आतापर्यंत 92 लाख 36 हजार 500 नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. यामध्ये मुंबईतील सर्व शासकीय, महानगरपालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांवरील कामगिरीचाही समावेश आहे. त्यामुळे हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातोय.
मुंबई शहराची इतकी मोठी लोकसंख्या असताना, अतिशय कमी वेळेत मुंबई महापालिका प्रशासन आणि मुंबईकरांनी एकत्रितपणे ही कामगिरी केलीय. इतका मोठा टप्पा गाठला तरी लसीकरण थांबलेले नाहीये. मुंबईच्या बिकेसी येथील जम्बो लसीकरण केंद्रात आजही लसीकरण सुरूच आहे. दुसरीकडे 65 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेत. पुढील काही दिवसात मुंबईतील 70 टक्के नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण झालेले असतील. त्यामुळे टास्क फोर्स नुसार मुंबई सेफ झोन मध्ये जाईल. त्यानंतर राज्य सरकार आणखी काही निर्बंध शिथिल करण्याची शक्यता देखील आहे. मुंबई सोडली तर इतर शहरांमध्ये मात्र अजूनही लसीकरणाचा हवा तसा वेग बघायला मिळत नाही.
मुंबईने गाठला दीड कोटी लसीकरणाचा टप्पा
मुंबई महानगरामध्ये कोरोना लसीचा पहिला आणि दुसरा डोस मिळून एकूण दीड कोटी मात्रा देण्याची कामगिरी 10 नोव्हेंबर रोजी साध्य करण्यात आली. त्यापाठोपाठ पहिल्या लसीचे लक्ष्य गाठून बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने कोविड लसीकरण मोहिमेत आणखी एक मैलाचा टप्पा गाठला आहे.
जनगणनेच्या सांख्यिकी आधारे आणि पात्र नागरिकांची संख्या लक्षात घेता, शासनाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना आपापल्या क्षेत्रात लसीकरणाचे उद्दिष्ट निश्चित करुन दिले आहे.
सर्व संबंधित पात्र नागरिकांनी कोविड लसीची दुसरी मात्रा देखील घेवून लसीकरण पूर्ण करावे यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा आणि जनजागृती करण्यात येत आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंतच्या कालावधीत सुमारे 59 लाख 83 हजार 452 मुंबईकर नागरिकांनी दुसरी मात्रा देखील घेतल्याची नोंद झाली आहे. पहिल्या मात्रेचे लक्ष्य पूर्ण झाल्याने आता दुसऱ्या मात्रेचे लक्ष्य देखील लवकरात लवकर गाठण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
महत्त्वाच्या बातम्या :