Bhayandar Accident News : आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या चिमुकल्याचा अपघाती मृत्यू, भाईंदरमधील घटनेने हळहळ
Bhayandar Accident News : पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या कुटुंबियाच्या दुचाकीचा अपघात झाला असून या अपघातात 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू झालाय.
भाईंदर : मुंबईतील (Mumbai) भाईंदर (Bhayandar) परिसरामध्ये मन हेलावून टाकणारी घटना घडली. पत्नीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी दुचाकीवरुन निघालेल्या कुटुंबाच्या दुचाकीचा अपघात (Accident) झाला. या अपघातात आईच्या मांडीवर असलेल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. शनिवार 25 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. दरम्यान दक्ष शहा असं या चिमुकल्याचं नाव आहे.
कुणाल शाह हे पत्नी जिग्ना शाह आणि पाच वर्षाची मुलगी कियरा तसेच 11 महिन्याचा दक्ष असं कुटुंब त्यादिवशी बाहेर आनंद साजरा करण्यासाठी गेलं होतं. परंतु त्यांच्या या आनंदावर वाटेतच विरजण पडलं. जिग्ना यांचा त्या दिवशी वाढदिवस होता. त्याच दिवशी त्यांनी आपल्या 11 महिन्यांच्या चिमुकल्याला गमावलं. दरम्यान या घटनेमुळे भाईंदर परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जातेय.
नेमकं काय घडलं ?
शहा कुटुंब हे शनिवार 25 नोव्हेंबर रोजी जिग्ना शाह यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर पडलं होतं. भाईंदर पश्चिमेच्या गोराई समुद्रकिनार्यावरील रिसॉर्टमध्ये सहकुटुंब वाढदिवस साजरा करण्याचे त्यांनी ठरवलं होतं. भाईंदरवरुन गोराई जवळ असल्याने त्यांनी दुचाकीवरुन जाण्याचे ठरवलं. त्यानुसार संध्याकाळी 4 वाजता कुणाल शहा यांच्या दुचाकीवर हे चौघेजण निघाले होते. कुणाल शाह हे गाडी चालवत होते. 5 वर्षांची कियरा पुढे होती तर 11 महिन्यांचा दक्ष हा आईच्या मांडीवर बसला होता. ते उत्तन रोड येथील सुरभी हॉटेलजवळून जात असताना, रस्त्यात साचलेल्या पाण्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. त्यामुळे जिग्ना यांच्या हातून दक्ष खाली पडला. त्याच्या डोक्याला जोरात मार लागल्याने त्याला दुखापत झाली. दरम्यान डोक्याला मार लागल्याने चिमुकल्या दक्षचा मृत्यू झाला.
याप्रकरणात भाईंदर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात दुचाकी घसरल्याने हा अपघात झाला होता. यामध्ये शहा दाम्पत्य आणि त्यांची मुलगी जखमी झाले आहेत, अशी माहिती भाईंदर पोलीस ठाण्यात वरीष्ठ निरीक्षक सुर्यकांत नाईकवाडे यांनी दिली.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू
विरारमध्ये (Virar News) डॉक्टरच्या निष्काजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉक्टराच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत चिमुरड्याच्या पालकांनी केली आहे. ताप आल्याने या दोन वर्षाच्या लहानग्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, चुकीच्या औषधोपचारामुळे बाळ दगावला असल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
हेही वाचा :
Virar News : डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे दोन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप