(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai BEST Bus News : मोठी बातमी! बेस्टच्या ताफ्यातील 400 बसचा वापर तात्पुरता बंद, प्रशासनाने दिले आगीचे कारण
Mumbai BEST Bus News : मुंबईकर प्रवाशांना गुरुवारपासून मनस्ताप होण्याची शक्यता आहे. बेस्टकडून कंत्राटी तत्वावरील 400 बस तात्पुरत्या स्वरुपात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Mumbai BEST Bus News : मागील काही दिवसांपासून बेस्टच्या बसला (BEST Bus) आग (Fire) लागण्याच्या घटना समोर येत आहेत. आज, बुधवारी ऐन गर्दीच्या वेळी अंधेरी पूर्व (Andheri East) येथील आगरकर चौकात सीएनजी बसला आग लागल्याची घटना घडली. बेस्ट बसला आग लागण्याचे प्रमाण वाढत असल्याने बेस्ट प्रशासनाने आता मोठा निर्णय घेतला आहे. बेस्टच्या ताफ्यात असणाऱ्या 400 कंत्राटी बसेसच्या सेवा तात्पुरत्या काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. बेस्ट प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला असून प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबईकरांसाठी बेस्ट बस सेवा ही लाईफलाईन समजली जाते. दररोज जवळपास 30 लाखांच्या आसपास प्रवासी बेस्ट बसने प्रवास करतात. मात्र, मागील काही दिवसांत तीन बेस्ट बसला आग लागल्याची घटना घडली आहे. या बसेस मातेश्वरी लिमिटेड या कंत्राटदाराच्या ताफ्यातील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आज, अंधेरीतील आगरकर चौकात ज्या बसला आग लागली ती बस मातेश्वरी या कंत्राटदाराची आहे. त्यामुळे आता, या कंत्राटदाराच्या ताफ्यातील बसेसची तपासणी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. प्रवाशांच्या सुरक्षितेच्यादृष्टीने या बसेसची तपासणी होणे आवश्यक असल्याचे बेस्टच्या अधिकाऱ्यांनी म्हटले. प्रवाशांनी काही दिवस सहकार्य करण्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.
(2/2)Though it may cause inconvenience to commuters but public safety is of utmost importance to BEST & we can not compromise on that.There may be some changes in the schedules due to this.Commuters may keep this in mind while planning the journey for next few days. #bestupdates
— BEST Bus Transport (@myBESTBus) February 22, 2023
उद्यापासून प्रवाशांना मनस्ताप?
खर्च कमी करण्यासाठी बेस्ट प्रशासनाने लिजवर बसेस घेतल्या आहेत. तर, दुसरीकडे बेस्टच्या ताफ्यातील बसेसची संख्या कमी होत आहे. आता, बेस्ट प्रशासनाने मातेश्वरी लिमिटेडच्या 400 बसेस 'ऑफ रोड' करण्याचा निर्णय घेतल्याने बेस्ट बसचे वेळापत्रक कोलमडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकाच वेळी एवढ्या प्रमाणावर बसेस धावणार नसल्याने बेस्ट बसच्या वेळापत्रकात बदल करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. आधीच मुंबईत विविध कामांमुळे वाहतूक कोंडी असल्याने बस उशिराने धावतात. त्यातच आता, बसची संख्या कमी होणार असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: