(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mumbai vaccination : लसीकरणाचा विक्रम, मुंबई ठरला देशातील 1 कोटी लसीकरणाचा टप्पा पार करणारा पहिला जिल्हा
देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
मुंबई : देशात गेल्या काही दिवसात कोरोना लसीचे डोस देण्याचा विक्रम करण्यात आला आहे. आता लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने देखील एक विक्रम केला आहे. देशात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण झालेल्या जिल्ह्यांच्या यादीत मुंबईचा क्रमांक लागला आहे. कोविन पोर्टलवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत 1 कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत 1 कोटी 63 हजार 497 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यामध्ये 72 लाख 75 हजार 134 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर 27 लाख 88 हजार 363 नागरिकांनी कोरोनाचे दोन डोस घेतले आहे. सध्या मुंबईत 507 केंद्रावर लसीकरण मोहिम सुरू आहे. यापैकी 325 सरकारी केंद्र आहे तर 182 केंद्र हे खाजगी आहे.
मुंबईत सर्वाधिक डोस 27 ऑगस्टला
कोविन अॅपवरील माहितीनुसार मुंबईत मागील 30 दिवसातील आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर सर्वात अधिक डोस 27 ऑगस्टला देण्यात आले होते. या दिवशी 1 लाख 77 हजार 017 नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली होती. या शिवाय 21 ऑगस्टला 1 लाख 63 हजार 775 नागरिकांना तर 23 ऑगस्टला 1 लाख 53 हजार 881 नागरिकांना लस देण्यात आली होती.
कोविड लसीचा तिसरा डोस घेणं गरजेचं, व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉ. अँथनी फाऊची यांचं मत
मुंबईत काल 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत काल 422 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 303 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,23,458 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात तीन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 3532 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1446 दिवसांवर गेला आहे.