Mumbai Pollution : दिल्लीनंतर मुंबईच्या हवेतही बिघाड, प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर
Mumbai Pollution : दिल्लीनंतर आता मुंबईच्याही हवेची गुणवत्ता खालावली असल्याचं चित्र पाहायला मिळतयं. त्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई : मुंबईत (Mumbai) वाढणारे हवेचे प्रदूषण (Pollution) रोखण्यासाठी पालिकेकडून कठोर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे हिवाळ्यात (Winter) शेकोटी पेटवण्यावरही बंदी घातली जाणार आहे. याबाबत लवकरच सुधारित नियमावली जाहीर करण्यात येईल. मागील 24 तासात दिल्लीप्रमाणेच (Delhi) मुंबईतील काही भागातील हवेची गुणवत्ता बिघडल्याचं चित्र आहे. सोबतच, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील भागात देखील वायु प्रदूषणात भर पडली आहे. यामुळे दिवाळी दसरा आणि फटाके विसरा असं म्हणण्याची वेळ मुंबईवर आलीये.
वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून त्याचा आरोग्यावर देखील परिणाम दिसू लागलं आहे. राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली होती. मात्र, नियमावली धाब्यावर बसवल्या जात असल्याचं चित्र सर्वत्र दिसतंय. अशातच, मुंबईत शेकोटीवर देखील बंदी घालण्यात आली असून पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलण्यात येणार आहे. तसेच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर केली जाणार आहे.
अशी असेल पालिकेची नियमावली
मुंबईत बांधकाम सुरु असलेल्या ठिकणी 15 दिवसांत प्रिंक्लर आणि महिनाभरात स्मॉग गन लावण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आलेत. जर या नियमांचं पालन केलं नाही तर जागच्या जागी 'स्टॉप वर्क' नोटीस देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच रस्त्यावर राहणाऱ्या बेघरांना हिवाळ्यात सुविधा देण्याचे प्रयत्न करण्यात येतील. एक एकर किंवा त्यापेक्षा अधिक क्षेत्रात बांधकाम असलेल्या जागेच्या अवतीभोवती किमान 35 फूट उंचीचे लोखंडी / पत्र्यांचे आच्छादन असावे. त्याशिवाय, संपूर्ण बांधकाम क्षेत्र ज्यूट किंवा हिरव्या कपडय़ाने झाकलेले असावे.
धूळ उडू नये यासाठी दिवसातून किमान 4-5 वेळा पाण्याची फवारणी करावी. रस्त्यांवरील धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अॅण्टी स्मॉग मशीन लावाव्या लागतील. प्रत्येक बांधकामाच्या ठिकाणी स्वतंत्र वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणारी यंत्रणा बसवावी. सर्व 24 वॉर्डमध्ये सहाय्यक आयुक्तांच्या निर्देशानुसार दोन वॉर्ड अभियंता, एक पोलीस, एक मार्शल आणि एक वाहन अशा स्कॉडच्या माध्यमातून गस्त घालण्यात येईल.
दंडात्मक कारवाई करण्यात येणार
यात नियम मोडल्याचे दिसल्यास रोख दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच कामबंद नोटीस देखील बजावण्यात येईल. त्यामुळे आता बांधकाम व्यावसायिकांना योग्य काळजी घेण्याची आणि नियम पाळण्याची गरज निर्माण झाली आहे. तसेच उघड्यावर कचरा जाळणे, तसेच शेकोट्या पेटवण्यास देखील बंदी घातली जाणार आहे.
राज्यातील इतर भागातही हवेची गुणवत्ता खालावली
मुंबईसोबतच विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील देखील हवा बिघडली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यातील हवा गुणवत्ता पातळी वाईट श्रेणीत गेलेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. अशात, ही परिस्थिती आणखी वाईट होण्याची स्थिती नाकारता येत नाही.
राज्य | एक्यूआय | श्रेणी |
अकोला | 297 | वाईट |
नागपूर | 214 | वाईट |
धुळे | 209 | वाईट |
जळगाव | 313 | अतिशय वाईट |
नांदेड | 207 | वाईट |
बदलापूर | 208 | वाईट |
नवी मुंबई | 216 | वाईट |
हिवाळ्यात सोसायट्यांमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांकडून शेकोटय़ा पेटवल्या जातात. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात धूर निर्माण झाल्याने प्रदूषण वाढते. मुंबईत 2019 ते 2023 या कालावधीत ऑक्टोबर PM 2.5 पातळीमध्ये सातत्याने वाढ झालीये. जे हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय घट दाखवतायत. गेल्या महिन्यात ऑक्टोबरच्या तुलनेत मुंबईतील हवेच्या प्रदूषणात 42 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे वाढत्या प्रदूषणाचे परिणाम आरोग्यावर दिसणार यात शंका नाही.