मुलुंड, ऐरोली टोलनाक्यांवर सरकारी आदेशाची पायमल्ली
मुंब्रा बायपासवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडी कमी व्हावी यासाठी मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यांपैकी एकाच टोलवर वसुली करण्याचे आदेश टोल कंपनीला दिले होते.
नवी मुंबई : मुंब्रा बायपासवर दुरुस्तीचे काम सुरू असल्याने त्या मार्गावरील वाहतूक मुलुंड आणि ऐरोली टोलनाक्यामार्गे वळविण्यात आली आहे. मात्र मोठ्या प्रमाणात जड वाहतुकीचा ताण या रस्त्यावर आल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी या मार्गावर होत आहे. मुलूंड आणि ऐरोली टोलनाक्यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत आहे. यावर उपाय म्हणून एमएसआरडीसीने मुलुंड आणि ऐरोली टोल नाक्यांपैकी एकाच टोलवर वसुली करावी, असे आदेश टोल कंपनीला दिले होते.
मुलुंड टोल नाक्यावर पैसे भरल्यास ती पावती ऐरोली टोल नाक्यावर दाखवून मोफत जाता येईल किंवा ऐरोली टोल भरल्यास मुलुंड टोल नाक्यावर पैसे घेण्यात येणार नाही, असा आदेश होता. मात्र एक महिन्यापूर्वी आदेश देऊनही दोन्ही टोलनाक्यावर वसुली सुरुच होती. अखेर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर कालपासून एक टोलनाक्यावर वसुली करण्याचा पवित्रा घेतला आहे.
टोल कंपनीने हा पवित्रा घेतला असला तरी अजूनही सरकार आणि वाहनचालकांच्या डोळ्यात धुळफेक करून दोन्ही टोलनाक्यावर वसुली सुरूच आहे. वाहतूकदारांना टोल फ्री कूपन देण्यात येत असल्याचे बॅनर टोलनाक्यावर मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले नाहीत. प्रत्येक लेनमध्ये हे बँनर लावणे गरजेचे असले तरी एक-दोन लेनवर कूपन फ्रीचे बॅनर ठेवले आहेत. कूपन फ्रीचे बॅनरही अशा ठिकाणी ठेवलेत की वाहतुकदारांची नजर त्यावर पडणार नाही.
त्यामुळे वाहनधारक अजुनही दोन्ही टोल नाक्यांवर टोल भरून प्रवास करत आहेत. त्यांच्याकडून पैसे घेणारेही पुढील टोल नाक्याचे फ्री कुपन घ्यावे अशी कल्पना देत नाहीत. त्यामुळे सरकारने जरी एक टोलनाका फ्री सोडण्याचा निर्णय घेतला असला, तरी नेहमीप्रमाणे आताही टोल कंपन्या या निर्णयाला फाटा देत टोलवसुली करत आहेत.