अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, ईडी कोठडीची मागणी न्यायालयाने फेटाळली
मनी लाँड्रिंगप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेल्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे मनी लाँड्रिंगप्रकरणी अनिल देशमुखांचा कोठडीतला मुक्काम वाढला आहे. अनिल देशमुखांनी ईडीची कोठडी वाढवून देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पण आता त्यांना 14 दिवस न्यायालयीन कोठडीत रहावं लागणार आहे.
ईडी कोठडी संपल्यानंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सुनावणीसाठी कोर्टात हजेरी लावली होती. ईडीकडून देशमुख्यांच्या 9 दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती. पण ती न्यायालयाने नाकारली आणि देशमुखांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली.
मुंबईतील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला 100 कोटी रुपये वसूल करण्यात यावेत असा आदेश अनिल देशमुखांनी दिला होता आणि याची जबाबदारी त्यांनी सचिन वाझे यांच्यावर सोपवली होती अशी तक्रार मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केली होती. त्याची दखल घेऊन सीबीआय आणि इडीने अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल करुन तपासाला सुरुवात केली होती. ईडीने पाच वेळा समन्स बजावूनदेखील अनिल देशमुख आले नव्हते. ते आऊट ऑफ रीच होते. त्यानंतर चार दिवसांपूर्वी अनिल देशमुख मुंबईतील ईडीच्या कार्यालयात हजर झाले.
हृषिकेश देशमुख यांनाही चौकशीसाठी बोलावलं
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख शुक्रवारी ईडी चौकशीला हजर राहिले नव्हते. कायदेशीर मार्गांची चाचपणी केल्यानंतरच ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती देशमुख कुटुंबियांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली होती. तर यासाठी हृषिकेश देशमुख यांनी ईडीकडे 15 दिवसांची मुदत देखील मागितल्याच्या माहितीही त्यांनी दिली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
अनिल देशमुखांना पाचवेळा ईडीचं समन्स
ईडीनं पाचवेळा अनिल देशमुखांना ईडीचं समन्स पाठवलं होतं. वैद्यकीय कारणं, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी अशी कारणं अनिल देशमुखांकडून सांगण्यात आली. पण अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर प्रदीर्घ चौकशीनंतरही समाधान झालं नाही म्हणून ईडीनं देशमुखांना अटक केली. अनिल देशमुखांना अटक झाली ते कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात. पण हे आरोप करणारे परमबीर सिंह अद्यापही गायबच आहेत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.
महत्वाच्या बातम्या :
- मनी लॉंड्रिंग प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना ईडीचं समन्स
- 100 कोटींच्या वसुलीच्या लेटरबॉम्बबाबत कोणतेही अतिरिक्त पुरावे नाहीत, माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं चांदिवाल आयोगात प्रतिज्ञापत्र
- अनिल देशमुखांची दिवाळी कोठडीतच, अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी