(Source: ECI/ABP News/ABP Majha)
अनिल देशमुखांची दिवाळी कोठडीतच, अनिल देशमुखांना 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पुढील चौकशीसाठी देशमुखांना 14 दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासयंत्रणेतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाकडे केली.
मुंबई : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांना मंगळवारी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयाने 6 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे देशमुखांना यंदाची दिवाळी कारागृहातच काढावी लागणार आहे. पुढील चौकशीसाठी देशमुखांच्या कोठडीची गरज असल्याचा दावा ईडीच्यावतीनं करण्यात आला.
मनी लाँड्रिंग प्रकरण, महाराष्ट्र पोलीस आस्थापनातील एका कथित खंडणी टोळीशी संबंधित प्रकरणात अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून सोमवारी तब्बल 13 तास चौकशी करण्यात आल्यानंतर अनिल देशमुखांना रात्री उशिरा अटक करण्यात आली. त्यानंतर मंगळवारी त्यांना विशेष न्यायालयातील सुट्टीकालीन न्यायालयात अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. बी. जाधव यांच्यासमोर हजर करण्यात आलं. तेव्हा, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पुढील चौकशीसाठी देशमुखांना 14 दिवसांची कोठडी देण्यात यावी, अशी मागणी तपासयंत्रणेतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाकडे केली. त्याला देशमुखांच्यावतीनं ज्येष्ठ वकील विक्रम चौधरी आणि अनिकेत निकम यांनी जोरदार विरोध केला. देशमुखांवरील आरोपांची चौकशी आणि तपास करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं केंद्रीय अन्वेषण विभाग(सीबीआय)ला दिले होते. ईडीला तसे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्याचे ईडीला अधिकारच नाहीत असा युक्तिवादही चौधरी यांनी केला.
तसेच सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टातही ईडीनं अनिल देशमुख हे केवळ संशयित असल्याचे म्हटलेलं आहे. 29 ऑक्टोबरच्या मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणीतही त्याबाबतचा पुनरूच्चार करण्यात आला. त्यानुसार ते ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. मग तीन दिवसांत ईडीला असे कोणते पुरावे मिळाले की त्यांना अटक करणे आवश्यक वाटले?, असा सवालही चौधरी यांनी उपस्थित केला. तर दुसरीकडे, देशमुख (71) हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांचा खांदा निखळला असून त्यांना सतत आधाराची गरज भासते. तसेच त्यांची प्रकृतीही ठीक नसून त्यांना वयोमानानुसार अनेक आजार आहेत. फेब्रुवारीमध्ये कोविड 19 ची लागण झाली होती आणि हृदयविकार आणि उच्च रक्तदाबानेही ते ग्रस्त आहेत, त्यामुळे देशमुखांना ईडी कोठडी देण्यात येऊ नये, अशी विनंतीही चौधरी यांनी केली. मात्र, ती फेटाळून लावत न्यायालयाने देशमुखांना ६ नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.
घरचं अन्न, औषधं घेण्याची मुभा
देशमुखांच्या कोठडीतील चौकशीदरम्यान विशिष्ट अंतरावर त्यांच्या वकिलांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, तसेच त्यांना घरचे जेवण आणि औषधे पुरवण्यात यावित, यासाठी अर्ज न्यायालयात सादर करण्यात आला. न्यायालयाने दोन्ही अर्ज मान्य करून ईडीला तसे निर्देश दिले आहेत.