Raj Thackeray : खड्डयावरून भाजप-मनसेत बिनसलं! मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यावरून राज ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
Raj Thackeray : भाजप-मनसेची दोस्ती बिनसल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतंय आणि याला कारणीभूत ठरलेत ते म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे..
मुंबई : भाजप-मनसेची दोस्ती बिनसल्याचं चित्र सध्या पहायला मिळतं आहे आणि याला कारणीभूत ठरलेत ते म्हणजे मुंबई-गोवा महामार्गावरील (Mumbai Goa Express Highway) खड्डे. भोंग्याचा मुद्दा असो किंवा मग हिंदुत्वाचा मुद्दा, राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मनसेने घेतलेल्या भूमिकेमुळे भाजप मनसेचे सूत जुळलंय का? अशी चर्चा जोरात सुरू झाली होती. एवढंच काय तर, भाजप-मनसे एकत्र येतील, असे तर्कही लावले गेले होते. त्यातच राज्याच्या राजकारण भाजपसोबत आधी शिंदे आणि आता आलेले अजित पवार यामुळे मनसेचं काय? अशी चर्चा सुरू असतानाच आता मुंबई-गोवा महामार्गाचा मुद्दा घेत मनसेने भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे.
राज ठाकरेंची खड्ड्यांवरून भाजपवर जोरदार टीका
पनवेलच्या मेळाव्यात तर राज ठाकरे यांनी खड्ड्यांच्या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार टीका केली. भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता पक्ष उभा करायलाही शिकावं असा टोला राज ठाकरेंनी लगावला आणि मनसेने आणि भाजप आमने-सामने आले आहेत. राज ठाकरेंच्या मेळाव्यानंतर खड्ड्याच्या मुद्द्यावरून मनसेने त्यांच्या खळखट्याकच्या स्टाईलने आंदोलन करत अनेक ठिकाणी तोडफोड केली. अखेर मनसेच्या या तोडफोडीमुळे सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना खरमरीत पत्र लिहावं लागलं. रवींद्र चव्हाण यांनी पत्र लिहीत मनसेला प्रत्युत्तर दिलं आहे.
रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण यांनी पत्रात लिहिलं आहे की, जे कार्यकर्ते स्वतःला महाराष्ट्र सैनिक म्हणवतात त्यांनी स्वतःला प्रश्न विचारायला हवा की कुठला सैनिक आपल्या देशाचे आणि आपल्या राज्याच्या मालमत्तेचे तोडफोड करून नुकसान करतो ? तो कसा काय महाराष्ट्र सैनिक? आम्हीही रस्त्यावर आंदोलन करून इथपर्यंत पोहोचलो पण आमची निष्ठा सर्वप्रथम देश नंतर पक्ष आणि शेवटी स्वतः हीच आहे. त्यात अशी तोडफोड करून विघ्न आणण्याचं कारण समजण्यापलीकडे असल्याचे रवींद्र चव्हाण यांनी पत्रात म्हटलंय.
संदीप देशपांडेंची आक्रमक प्रतिक्रिया
रवींद्र चव्हाण यांच्या या पत्रानंतर मनस नेते संदीप देशपांडे यांनी देखील आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. खड्ड्यात पडून लोकांचा जीव जातो, ते महाराष्ट्र द्रोही की महाराष्ट्र प्रेमी. झोपी गेलेल्यांना कानाखाली मारण्याचे काम मनसेने केल्याचेही संदीप देशपांडे म्हणाले आहेत.
वाद मिटणार की पेटणार?
एकूणच काय एकेकाळी सुरात सूर मिसळणारे भाजप आणि मनसेचे नेते महामार्गावरील खड्ड्यावरून आमने सामने आले आहेत. येत्या काळात हा वाद आणखी पेटणार की मिटणार हे पाहणं महत्वाचे ठरेल..