युती सरकारविरोधात मनसेचा ठाण्यात विराट मोर्चा
अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ठाण्यातील जवळपास 25 हजार कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा जाधव यांनी केला.
ठाणे : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती सरकारविरोधात वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ठाण्यात विराट मोर्चा काढण्यात आला. ठाण्यातील तीन हात नाका ते जिल्हाधिकारी कार्यालयावर हा महामोर्चा काढण्यात आला. टोलचा झोल, शेतकऱ्यांची फसवणूक, कल्याण-डोंबिवलीतील 27 गावांची वेगळी महापालिका, कोपरी पूल असे अनेक मुद्दे घेऊन हा मोर्चा काढण्यात आला होता.
भाजप आणि शिवसेना युतीच्या सरकारने जनतेना अनेक आश्वासनं दिली. मात्र त्यातील एकाही आश्वासनांची पूर्तता केली नसल्याचा आरोप मनसेनं केला आहे. भाजप-शिवसेनेचं सरकार फेल झाल्याचं मोर्चातून दाखवण्याचा प्रयत्न मनसेने केला. महागाई, शेतकरी प्रश्न आणि भरष्टाचाराबाबत सरकारला घेरण्याचा प्रयत्न मनसेनं केला.
मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ठाण्यातील जवळपास 25 हजार कार्यकर्ते सहभागी झाल्याचा दावा जाधव यांनी केला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर जिल्हाधिकाऱ्यांन मागण्याचं निवेदन देण्यात आलं. त्यानंतर या विराट मोर्चाची सांगता झाली.
मनसेच्या मागण्या
- कल्याण-डोंबिवलीकरांसाठी जाहीर झालेल्या 6 हजार 500 कोटींच्या पॅकेजचं काय झालं? - भिवंडीतील टोरंटो या खासगी वीज कंपनीवर कायदेशीर कारवाई करा - ठाण्यातील क्लस्टर योजनाचं काय झालं? - ठाणे जिल्ह्यातील टोल कधी बंद करणार? - ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा कोपरी पुलाचं काम केव्हा सुरु होणार? - दिवा डम्पिंग ग्राऊंड त्वरीत बंद करा - मानकोली आणि शिळफाटा पुलाचे काम त्वरीत सुरु करा - निकृष्ट दर्जाच्या कामामुळे खराब झालेल्या मुंब्रा बायपस रस्त्याचं नुतनीकरण करा - समृद्धी महामार्गासाठी केलेल्या जमिनीच्या अनियमित हस्तांतरणाची चौकशी करा