(Source: ECI/ABP News/ABP Majha)
"रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवं उभं करा"; राजू पाटलांची नितीन गडकरींकडे मागणी
MNS MLA Raju Patil Tweet : रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय
MNS MLA Raju Patil Tweet : आता कारमध्ये बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सीट बेल्ट लावावा (Seatbelt New Rule) लागणार आहे. म्हणजेच, आता कारच्या मागील सीटवर बसणाऱ्यांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी यासंदर्भात मोठी घोषणा केली. गडकरींच्या या घोषणेनंतर मनसेचे (MNS) आमदार राजू पाटील (MNS MLA Raju Patil) यांनी एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून त्यांनी नितीन गडकरी यांच्याकडे एक मागणी केली आहे. तसेच, रस्त्यांची दुरावस्था आणि खड्डे यांवरुन राजू पाटील यांनी नितीन गडकरींना टोलाही लगावला आहे.
मनसेचे आमदार राजू पाटील यांनी एक ट्वीट केलं आहे. त्यांच्या या ट्वीटची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, "सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे, तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय!" महत्त्वाचं म्हणजे, राजू पाटील यांनी हे ट्वीट केंद्रीय रस्ते, वाहतूक मंत्री नितीन गडकरींना टॅग केलं आहे. तसेच, हे ट्वीट करताना त्यांनी #आता_सहन_नाही_होत असा हॅशटॅग वापरला आहे. राजू पाटील यांनी नितीन गडकरींकडे केलेल्या मागणीचं नेटकऱ्यांकडून स्वागत होत आहे.
मनसे आमदार राजू पाटील यांचं ट्वीट :
सुरक्षेच्या दृष्टीने जसं सीटबेल्ट बांधणं अनिवार्य केलं आहे तसंच रस्त्याच्या दुरावस्थेला कारणीभूत असणारे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना खड्ड्यांमध्ये ओणवे उभं करण्याचीही तरतूद करा मंत्रीमहोदय ! @nitingadkari #आता_सहन_नाही_होत.
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) September 7, 2022
सध्या महामार्गांवर अपघातांचं सत्र सुरु आहे. आधी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अपघात आणि त्यानंतर झालेला टाटा समूहाचे (Tata Group) माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री (Cyrus Mistry) यांचा अपघात यामुळे महामार्गांवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. देशातील महत्त्वाच्या महामार्गांपैकी एक असणाऱ्या मुंबई-पुणे महामार्गावर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचा अपघात झाला. याच अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघात अहमदाबादहून मुंबईला परतताना झाला. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. याच पार्श्वभूमीवर महामार्गांवर वेगानं धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या निर्णयाची घोषणा करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
सीट बेल्ट संदर्भातील घोषणा करताना नितीन गडकरी यांनी सायरस मिस्त्रींच्या अपघाताचा दाखला दिला. ते म्हणाले की, "टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा रविवारी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाला. या नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. वेगानं धावणाऱ्या वाहनांवर लक्ष ठेवण्याची आणि मागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्टचा वापर अनिवार्य करण्याची गरजही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अपघात होऊ नयेत यासाठी रस्त्यांची योग्य आखणी करावी, यावरही त्यांनी भर दिला आहे." यावेळी गडकरींनी रस्ते अपघातांची आकडेवारीही सांगितली. गडकरी म्हणाले की, देशात वर्षभरात 500,000 रस्ते अपघात झाले आहेत. ते म्हणाले की, 60 टक्के रस्ते अपघातांमध्ये 18-34 वयोगटातील लोकांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :