(Source: ECI | ABP NEWS)
Mira Bhayandar: 100 दिवसांच्या विशेष कामगिरीसाठी मिरा-भाईंदरच्या पोलीस आयुक्तांचा झाला गौरव; पण हद्दीत जुगार, गुटखा, हुक्का पार्लर खुलेआम सुरू, राजकीय पक्षाच कनेक्शन
Mira Bhayandar: वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीत जुगार, गुटखा, हुक्का पार्लर यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचं आता बाललं जात आहे.

नालासोपारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमा अंतर्गत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने विविध उपक्रम राबवले आहेत. नुकताच त्याचा निकाल जाहीर झाला असून आयुक्तलयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. आयुक्तालयास 100 पैकी 84.57 गुण प्राप्त झाले आहेत. या 100 दिवसांच्या विशेष कामगिरीसाठी मिरा-भाईंदरचे पोलीस आयुक्तांना गौरवण्यात आले असतानाच, त्यांच्या कार्यक्षेत्रातच अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं आहे. वसई-विरार, मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालय हद्दीत जुगार, गुटखा, हुक्का पार्लर यांसारखे बेकायदेशीर व्यवसाय खुलेआम सुरू असल्याचं आता बाललं जात आहे.
राजकीय पक्षाच्या दुकानात देखील हुक्का पार्लर ...
एबीपी माझाच्या एका प्रेक्षकाने पाठवलेल्या व्हिडिओमध्ये, नालासोपारा पूर्वेतील आचोळे स्मशानभूमी जवळील एका दुकानात हुक्का पार्लर बिनधास्तपणे सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे. या हुक्का पार्लरमध्ये तरुणांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, हुक्का ओढण्यास त्यांना खुलेआम प्रोत्साहन दिलं जात आहे. कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका असूनही, युवक या व्यसनात अडकत असल्याचं पाहायला मिळत आहे. इतकंच नव्हे, तर नालासोपारा स्टेशनजवळील एका राजकीय पक्षाच्या दुकानात देखील हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती, नाव न सांगण्याच्या अटीवर एका स्थानिक नागरिकाने दिली आहे.
हा संपूर्ण प्रकार सर्रासपणे सुरू असल्याचं दिसून येत आहे. पोलिसांच्या डोळ्या देखत सुरू असलेल्या या अवैध धंद्यांकडे स्थानिक प्रशासन आणि पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. वरवर कायदा-सुव्यवस्थेचं कौतुक होत असलं, तरी प्रत्यक्षात बेकायदेशीर धंद्यांचा विळखा घट्ट होत चालला आहे. यावर त्वरित कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभरातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये 7 कलमी 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहिम राबविण्याकरीता निर्देश दिले होते. या सात कलमी कार्यक्रमात कार्यालयातील सोयीसुविधा, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या तक्रारीचे निवारण, गुंतवणुकीस प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी, संकेतस्थळ आदींचा समावेश आहे. त्याच पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाने या अंतर्गत विविध उपक्रम राबवून कार्यालयीन सोयीसुविधा यासह नागरी तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने उपायोजना आखल्या आहेत. यात आयुक्तलयाचे संकेतस्थळ अद्यावत करण्यात आले आहे. याशिवाय त्याचे (CERTIn) यांचे मार्फतीने सायबर ऑडीट केले आहे.
























