Kopari Bridge | अखेर कोपरी पुलाच्या नव्या मार्गिकांचे लोकार्पण!
पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या (Kopari Bridge) नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
ठाणे : पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुंबई आणि ठाण्याला जोडणाऱ्या कोपरी पुलाच्या नव्या मार्गिकेचे उद्घाटन आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे यांच्या हस्ते करण्यात आले. बांधकाम होऊनदेखील गेले अनेक महिने या मार्गिकाचे उद्घाटन करण्यात आले नव्हते. कारण मनसेने या ब्रिजला तडे गेल्याचे उघडकीस आणून आंदोलन केले होते. त्यानंतर आयआयटीमार्फत पुलाचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्यात आला. त्यानंतर आज तडकाफडकी या पुलाचे उद्घाटन करण्यात आले.
सद्य परिस्थिती पाहता पूर्व द्रुतगती महामार्गावर केवळ दोन लेन असलेल्या कोपरी पुलामुळे बॉटल नेक तयार होऊन वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळेच या ठिकाणी दोन्ही बाजूला नवीन मार्गिका बांधून, जुना कोपरी पुलाच्या जागी नवीन पूल उभारण्याचे मोठे काम हाती घेण्यात आले होते. एमएमआरडीए मार्फत हे काम करण्यात येत होते. आज अखेर या नवीन बांधलेल्या मार्गिकांचे लोकार्पण झाल्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई आणि ठाण्याला जोडण्यासाठी रेल्वे मार्गावरून जाणारा 4 मार्गिकेचा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने 1958 साली उभारला. त्यालाच कोपरी ब्रिज असे नाव पडले. वाहतूक वाढल्याने 1995 नंतर एमएमआरडीएने पुलाच्या बाजूला दोन मार्गिका वाढवल्या. मात्र, त्यानंतर ठाणे आणि मुंबई शहराचा प्रचंड विकास झाला, त्यामुळे फक्त चार मार्गिकेचा असलेला कोपरी ब्रिज वाहतुकीसाठी अपुरा पडू लागला. त्यात 22 जून 2017 ला रेल्वेवरील ब्रिज आयआयटीच्या सर्वेक्षणात हा पूल धोकादायक निष्पन्न झाल्याने या पुलाचे तातडीने पुनर्निर्माण करण्याची आवश्यकता होती. त्यामुळे या पुलाच्या विस्तारीकरणासाठी मंजुरी मिळाली आणि 258 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. अखेर 21 मे 2018 ला या पुलाच्या पुनर्निर्माण कार्याचे भूमिपूजन करण्यात आले.
या पुलाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात 1958 साली बांधलेला जुना कोपरी पूल पाडून त्या जागी नवीन पूल निर्माण करण्यात येईल. मात्र, त्याचे बांधकाम नोव्हेंबर नंतर सुरू करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. असे असले तरी अधिकच्या चार लेन उपलब्ध झाल्याने कोपरी पुलावर वाहतूक कोंडी होणार नाही. यामुळे एक प्रकारे मुंबई आणि ठाणेकरांचे स्वप्न सत्यात उतरणार आहे.