(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाणे आणि दिवेकारांच्या मरणयातना कधी संपणार?
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असूनही दिवा, मुंब्रा तसे दुर्लक्षितच म्हणावे लागतील. फक्त सुरक्षित प्रवास या एका मागणीसाठी त्यांना वारंवार आंदोलन करावं लागतं. मग लॉकडाऊनच्या दिवसांत जेव्हा लोकल बंद असताना त्यांचे हाल आपण विचारही करू शकत नाही.
ठाणे : मुंबईत कार्यालय सुरु झाली आणि मुंबईच्या आसपास असणाऱ्या महानगरांमधून या कार्यालयात येण्यासाठी गर्दी देखील वाढू लागली. फक्त ठाणे शहरातून लाखो कर्मचारी रोज मुंबईत येतात, मात्र त्यांना हा प्रवास करण्यासाठी मरण यातना सहन कराव्या लागत आहेत.
सरकारने मिशन बिगीन अगेन सुरु केले. त्यामध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालये देखील सुरु झाली. कार्यालयाची वेळ सकाळी नऊ ते सहा असेल तर साधारणतः आपण एक ते दीड तास आधी घरातून निघतो. मात्र दिव्यात राहणाऱ्या नागरिकांचं तसं नाहीये. "आम्ही सकाळी उठून, घरकाम करून, लवकरात लवकर या रांगेत उभे राहतो, नऊची कामावर जायची वेळ असेल तर सकाळी पाच ते सहा वाजल्यापासून रांगेत उभे राहावे लागते, तेव्हा कुठे दिव्यातून ठाण्यात जायला आणि तिथून पुढे जाण्यासाठी बस मिळते", असे एबीपी माझाशी बोलताना एका महिलेने सांगितले. ही महिला दिव्यातून ठाण्यात येण्यासाठी, टीएमटी बसची दीड तासापासून वाट बघत उभी होती.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात असूनही दिवा, मुंब्रा तसे दुर्लक्षितच म्हणावे लागतील. फक्त सुरक्षित प्रवास या एका मागणीसाठी त्यांना वारंवार आंदोलन करावं लागतं. तरी कोणी भिक घालत नाही, मग लॉकडाऊनच्या दिवसांत जेव्हा लोकल बंद असताना त्यांचे हाल आपण विचारही करू शकत नाही. फक्त दिव्यात बस पकडण्यासाठी दोन ते अडीच तास घालवल्यानंतर इतक्यावरच त्यांचे हाल संपत नाहीत. पुढे ठाण्यापर्यंत रस्ते, त्यावर असलेले खड्डे, त्यामुळे असलेले ट्राफिक या सर्वातून जीव वाचवत ठाण्यातील खोपट एसटी स्टँडवर यावे लागते.
खोपट एसटी स्टँडवर केवळ दिवा, मुंब्रा इथून नाही तर कळवा, घोडबंदर रोड आणि ठाण्यातील वेगवेगळ्या भागातून देखील अनेक कर्मचारी रांगेत उभे असतात. मात्र दिव्यातून येणाऱ्यांची व्यथा वेगळीच. "आम्ही दिवा मुंब्रा इथून येतो, ते 2 तास आणि पुढे सायन, अंधेरीपर्यंत 2 तास, तिथून पुढे दक्षिण मुंबईत जाण्यासाठी 1 तास, सर्व वेळ प्रवासात जातो, ऑफिसची वेळ चुकते", एका प्रवाशाने एबीपी माझाशी बोलताना सांगितले. "माझा मुलगा घरी असतो, त्याला सोडून हॉस्पिटलमध्ये काम करते, जेव्हा मी बाहेर जाते तेव्हा नवरा सांभाळतो, आणि मी घरी आले की, तो कामावर जातो", अशी प्रतिक्रिया दुसऱ्या एका महिलेने दिली.
हाच रस्ता आणि हाच त्रास त्यांना परतीच्या प्रवासात देखील सहन करावा लागतो. आणि हे केवळ एक दिवस नाही तर गेले अनेक महिने जेव्हा पासून लोकल बंद आहेत, तेव्हापासून सहन करावा लागत आहे. या प्रवासात सोशल डिस्टनसिंग वगैरे काहीच पाळलं जात नाही, त्यामुळे कोरोनाचा धोका वेगळाच. ही धडपड फक्त जगण्यासाठी 4 पैसे कमवायला सुरु आहे. कार्यालये सुरु तर झाली पण वाहतूक व्यवस्था पुरेशी आहे की नाही? हे सरकारने आधी तपासून बघायला हवे होते. तसे न केल्याने आज लाखो प्रवाशांना मानसिक आणि शारीरिक त्रासाला समोरे जावे लागत आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
मुंबईत रिक्षाचालाकाला लुटणारी टोळी गजाआड
ठाण्यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई, एका दिवसात 58 हजारांचा दंड वसूल