(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ठाण्यात विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई, एका दिवसात 58 हजारांचा दंड वसूल
कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी आता ठाणे महानगरपालिकेने कडक कारवाई सुरु केली आहे.विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवरील कारवाईत एका दिवसात तब्बल 58 हजारांचा दंड वसूल केला आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेने मास्क न लावता फिरणाऱ्या नागरिकांना 500 रुपयांचा दंड आकारण्यात आजपासून सुरुवात केली. या मोहिमेंतर्गत ठाणे शहराच्या वेगवेगळ्या भागात तब्बल 116 व्यक्तींवर आज कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून आज संध्याकाळपर्यंत तब्बल 58 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही कारवाई यापुढेही अशीच सुरू ठेवण्याचा आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर विपीन शर्मा यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसात महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक ठिकाणी तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयांमध्ये अनेक जण मास्क न लावता फिरत असल्याचे दिसून येत होते. नियमांचे पालन न केल्याने covid-19 ची रुग्ण संख्या देखील वाढत होती. त्यामुळेच सार्वजनिक क्षेत्रात फिरणाऱ्या प्रत्येक नागरिकाने तसेच सरकारी आणि खाजगी कार्यालयात प्रत्येकाने तोंडावर मास्क लावणी पालिकेने बंधनकारक केले. या नियमाचे उल्लंघन केल्यास 500 रुपयांचा दंड आकारण्याचे ठरवले.
आनंदाची बातमी! ऑक्सफर्डच्या लशीची चाचणी पुन्हा सुरु
आदेशाच्या पहिल्याच दिवशी महापालिका हद्दीमध्ये विना मास्क सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या एकूण 116 व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतंर्गत एकूण 58 हजार एवढा दंड वसूल करण्यात आला. यामध्ये माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीमध्ये 14 हजार दंड वसूल करण्यात आला. वर्तकनगरमधून 5500 तर लोकमान्यनगर-सावरकर प्रभाग समितीमधून 4500 दंड वसूल करण्यात आला. वागळे प्रभाग समितीमधून 3500, नौपाडा-कोपरी प्रभाग समितीतंर्गत 16500 तर कळवा प्रभाग समितीमधून 4000 एवढा दंड वसूल करण्यात आला. मुंब्रा प्रभाग समितीमध्ये या कारवाईमध्ये एकूण 4000 एवढा दंड वसूल केला तर दिवा प्रभाग समितीमध्ये एकूण 6000 एवढा दंड वसूल करण्यात आला.
Unlock 4 | ठाणे, नवी मुबंईतील मॉल्स सुरु, कोरोनामुळे मॉलसाठी वेगळी नियमावली