(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हाडाची घरं 25 ते 30 टक्क्यांनी स्वस्त होणार
मुंबईत यावर्षी म्हाडाच्या 1094 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. येत्या दहा दिवसात या लॉटरी प्रक्रियेच्या सर्व तारखा जाहीर होणार आहेत.
मुंबई : म्हाडाने आपल्या घरांच्या किमती 25 ते 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या वर्षी म्हाडाच्या काही घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेल्याने, म्हाडाच्या लॉटरीला नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळाला होता. त्याच पार्श्वभूमीवर म्हाडाने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली आहे.
मुंबई विभागासाठी यावर्षी म्हाडाच्या 1094 घरांसाठी लॉटरी निघणार आहे. येत्या दहा दिवसात या लॉटरी प्रक्रियेच्या सर्व तारखा जाहीर होणार आहेत. त्यामुळे म्हाडाच्या घरांची वाट पाहणाऱ्यासाठी खऱ्या अर्थानं आनंदाची बातमी आहे.
नाशिकमध्ये 1150, औरंगबादमध्ये 918, नागपूर 373 घरांची म्हाडाची लॉटरी निघणार आहे. या घरांच्या किंमतीही 20 ते 47 टक्क्यांनी कमी होणार आहेत. नाशिक, नागपूर आणि औरंगाबादची घरं विकली गेली नाही, तर पोलीस वसाहतीसाठी या तीन भागातील घर दिली जाणार आहेत. म्हाडामध्ये आता छोट्या घरांची ही टेंडर काढली जाणार आहेत.
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठीही काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी काही घरं बांधता येतील का याचा विचार सुरू आहे. यापुढे म्हाडाच्या घरांसाठी लिफ्ट, पार्किंग, जिम, चिल्डर पार्क, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, स्विमींग पूल, ग्रंथालय असणार आहे, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना बोनस 17 हजार, वैद्यकीय भत्ता 5 हजार रुपये मिळणार आहे. यामध्ये दरवर्षी 5% वाढ होणार आहे. म्हाडाच्या ड्रायवरसाठी 250 रूपये भत्ता दिला जाणार आहे. तसेच दरवर्षी 3 ड्रेस आणि 1500 रुपये शिलाई फी दिली जाणार असल्याची माहिती सामंत यांनी दिली.
कशी असणार आहे ही सूट ?
बिल्डरकडून येणाऱ्या घरात सूट
उच्च उत्त्पन्न गट - रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे 30 टक्के सूट मध्यम उत्पन्न गट - रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे 40 टक्के सूट अल्प उत्पन्न गट - रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे 50 टक्के सूट अत्यल्प उत्तन्न गट- रेडीरेकनरच्या किंमतीप्रमाणे 70 टक्के सूट
म्हाडाकडून बांधण्यात येणाऱ्या घरात 25 ते 30 टक्के सूट मिळणार आहे, मात्र ही सूट यंदाच्या लॉटरीत मिळणार नाही. पुढील लॉटरीत ही सूट मिळणार आहे.