भर मीटिंगमध्ये धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात सहआयुक्तांच्या पतीकडून शिवीगाळ, हल्ल्याचा प्रयत्न, मुंबईतील घटना
धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळी येथील धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात धक्कादायक प्रकार घडला.
मुंबई : धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वरळी येथील धर्मादाय आयुक्त यांच्या कार्यालयात धर्मादाय आयुक्तांची मिटींग सुरु असताना एका व्यक्तिनं प्रवेश करत शिविगाळ आणि धमकी दिल्याची घटना घडली आहे. धर्मादाय आयुक्त आपल्या सहकार्यांसोबत मीटिंगमध्ये असताना अचानक तिथे विवेक तरार नावाची व्यक्ती आली आणि मीटिंगमध्ये बसलेल्या धर्मदाय आयुक्त पी.एस.तरारे यांचे स्वीय सहाय्यक सरनोबत यांना शिवीगाळ करत त्यांच्या डोक्यावर बीअरची बॉटल मारण्याच्या प्रयत्न केला.सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला जेव्हा त्यांना कळलं की हा हल्ला करणारा विवेक तारा धर्मादाय सहआयुक्त सुनिता तरार यांचे पती आहेत.
काय आहे प्रकरण
वरळी येथील धर्मदाय आयुक्त कार्यालयाची इमारत धोकादायक असल्यामुळे त्यांचा कार्यालय सासमिरा येथे स्थलांतरित होणार आहे. ज्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी दुपारी दीडच्या सुमारास धर्मदाय आयुक्त यांच्या न्याय कक्षात या संबंधित बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीत धर्मदाय आयुक्त पी एस तरारे यांच्यासह इतर धर्मादाय सह आयुक्त आणि अधिकारी उपस्थित होते. स्थलांतर करण्यासंदर्भात चर्चा आणि कामासंदर्भात बैठक सुरू असताना अचानक एक इसम धर्मदाय आयुक्त यांच्या न्यायदान कक्षात घुसला आणि धर्मदाय आयुक्त यांच्या स्वीय सहाय्यक यांना धक्काबुक्की केली. शिवीगाळ करत अचानक धर्मदाय आयुक्त यांच्या न्याय कक्षात घुसून धर्मदाय आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक सरनोबत यांची कॉलर पकडून आपल्या खिशातली बिअरची बॉटल काढून त्यांना मारण्याचा प्रयत्न केला.
त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या लोकांनी मध्यस्थी केली आणि विवेक तरार याला धरून बाजूला केलं. मात्र तरीसुद्धा विवेक तर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तुम्ही गव्हर्मेंट सर्व्हंट आहात. तू माझं काय करशील ? तू लोकांचे कान भरतोस, तुझी लेकरं बाळं कसे जगतात ते बघतो अशी धमकी देत होता.
या सर्व प्रकरणाची माहिती मिळताच वरळी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी विवेकला अटक केली आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. विवेक तरार यांनी हा प्रकार का केला? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र हे सगळं जुन्या वादातून विवेकनं केलं असल्याची शक्यता आहे.