माथेरानमध्ये ई-रिक्षाला घोडेवाल्यांचा विरोध, प्रशासनाच्या बैठकीत मांडली नाराजी
Matheran: ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यटन वाढल्यास घोडेवाल्यांनाही त्याचा फायदाच होईल, अशी भूमिका कर्जत माथेरानचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे.
Matheran: ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळणार असून पर्यटन वाढल्यास घोडेवाल्यांनाही त्याचा फायदाच होईल, अशी भूमिका कर्जत माथेरानचे आमदार महेंद्र थोरवे यांनी घेतली आहे. घोडेवाल्यांकडून ई रिक्षाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज आमदार महेंद्र थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत माथेरानमध्ये घोडेवाले, नागरिक, व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार थोरवे यांनी ई रिक्षाच्या निर्णयाची पाठराखण केली.
वाहनबंदी असलेल्या माथेरानमध्ये तब्बल 172 वर्षांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ई- रिक्षा सुरू झाली आहे. मात्र या ई रिक्षामुळे आमच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचा आरोप करत घोडेवाल्यांनी ई रिक्षाला विरोध केला आहे. याबाबत घोडेवाल्यांच्या संघटनेने स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांना सुद्धा दोन वेळा निवेदनं दिली होती. या पार्श्वभूमीवर आज माथेरानमध्ये घोडेवाले, नागरिक, व्यापारी आणि नगरपालिका प्रशासन यांची बैठक पार पडली. या बैठकीला कर्जत माथेरानचे आमदार महेंद्र थोरवे हे देखील उपस्थित होते. यावेळी माथेरानमध्ये सुरू झालेल्या या ई रिक्षामुळे पर्यटकांची संख्या यंदाच्या हंगामात वाढली असून भविष्यातही ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळेल, असं मत आमदार थोरवे यांनी व्यक्त केलं. तसंच या वाढलेल्या पर्यटनाचा भविष्यात व्यापारी, नागरिक यांच्याप्रमाणेच घोडेवाल्यांना सुद्धा फायदाच होईल, अशी भूमिका आमदार थोरवे यांनी मांडली. ई रिक्षामुळे घोडेवाल्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी लवकरच पुन्हा एक बैठक घेऊन पुढील स्ट्रॅटेजी ठरवली जाईल, असंही आमदार थोरवे यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे पर्यटकांसोबतच माथेरानच्या नागरिकांकडूनही स्वागत होत असलेल्या ई रिक्षाचं आमदार महेंद्र थोरवे यांनीही समर्थन केल्याचं आजच्या बैठकीतून निष्पन्न झालं.
दरम्यान, वाहनबंदी असलेल्या माथेरान हिलस्टेशनवर तब्बल 172 वर्षांनी ई रिक्षा धावली आहे. ई- रिक्षा सुरू झाल्यामुळे माथेरानला येणाऱ्या पर्यटकांची तीन किलोमीटरची पायपीट वाचणार आहे. माथेरान गिरीस्थानाचा ब्रिटिशांनी 1850 साली शोध लावला. तेव्हापासून येथील पर्यावरणाचं नुकसान होऊ नये या हेतूने माथेरानमध्ये वाहनबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे पर्यटकांना दस्तुरी पॉईंटच्या वाहन तळावर गाड्या लावून पुढे माथेरान गिरीस्थानापर्यंतचा तीन किलोमीटरचा प्रवास हा घोडा किंवा हाताने ओढाव्या लागणाऱ्या रिक्षाने करावा लागत होता. नेरळ माथेरान दरम्यान धावणारी मिनीट्रेन सुद्धा आतापर्यंत अनियमित होती. त्यात घोडा आणि हातरिक्षाचे दरही अनेकांना परवडणारे नसल्यामुळे बहुतांशी पर्यटकांना दस्तुरी पॉईंट ते माथेरान अशी तीन किलोमीटरची पायपीट करावी लागत होती. वाहनबंदीचा माथेरानच्या पर्यटनाला मोठा फटका बसत होता. मात्र बदलत्या काळानुसार माथेरान गिरीस्थानावर पर्यावरणाचं नुकसान न करता ई रिक्षाला परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात येत होती. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माथेरानमध्ये ई रिक्षा सेवेचा प्रारंभ करण्यात आला.