ठाण्यातील वाघबीळ ब्रीजवर सतत अपघात, अभिनेता कुशल बद्रिकेचं FB लाईव्हद्वारे आवाहन
ठाण्यातील सूरज वॉटर पार्क समोर असलेल्या वाघबीळ ब्रीजवर होणारे सततचे अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मराठी अभिनेता कुशल बद्रिके याने केले आहे.
मुंबई : ठाण्यातील सूरज वॉटर पार्क समोर असलेल्या वाघबीळ ब्रीजवर होणारे सततचे अपघात थांबवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मराठी अभिनेता कुशल बद्रिके याने केले आहे. त्याने रात्री फेसबुक लाईव्ह करून रोज एकाच ठिकाणी होणाऱ्या अपघातांबद्दल माहिती दिली आहे. घोडबंदर रोडवर असलेल्या वाघबीळचा हा ब्रीज आहे. या आधी देखील कित्येक अपघात इथे झाले आहेत.
आपल्या फेसबुक लाईव्हमध्ये कुशल बद्रिके म्हणाला की, वाघबीळजवळ जो ब्रीज रस्त्यापासून वेगळा होतो तिथं कुठलंही साईन नाहीय. लाईट नाहीये. रोज इथं अपघात होतात. रोज इथं रिक्षा उलट्या होतात. कृपया यासाठी काहीतरी करा कारण रोज खूप नुकसान होत आहे. तुम्ही जर काही केलंत तर फार उपकार होतील. माझा काही कुणावर आरोप नाही, मात्र हे रोज घडत आहे. हा माझा काही स्टंट नाही. इथं एखादा लाईट लावता आला किंवा सोलार लाईट लावता आला तर अपघात वाचतील खूप लोकांचे जीव वाचतील, असं कुशल बद्रिकेनं म्हटलं आहे.
या फेसबुक लाईव्हमध्ये कुशलने एक ट्रक बंद अवस्थेत असल्याचं दाखवला आहे. रोज या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळं लोकांना यामुळं खूप त्रास होत असल्याचं कुशलनं म्हटलं आहे. मी खूप दिवस विचार करत होतो. रोज इथं काही ना काही घडत आहे. संबंधित अधिकाऱ्यांकडे हे पोहोचावं आणि काही उपाय केले जावेत यासाठी हा प्रयत्न असल्याचं कुशलनं म्हटलं आहे. मला या गोष्टीचं फार वाईट वाटतंय, लोकांना मदत व्हावी, एवढीच अपेक्षा आहे, असं कुशलनं म्हटलं आहे.
Posted by Kushal Badrike on Friday, September 11, 2020