(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आम्ही समर्थन करत नाही, ते आमचे कार्यकर्ते नाहीत; सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची स्पष्ट प्रतिक्रिया
Maratha Kranti Morcha: गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही, ज्यांनी हल्ला केला ते आमचे कार्यकर्ते नाहीत, मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया
Maratha Kranti Morcha on Gunaratna Sadavarte Car Vandalizedtion : मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या गाडीची आज सकाळी काही अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली. ही तोडफोड मराठा क्रांती मोर्चाच्या (Maratha Kranti Morcha) कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप होत आहे. अशातच आता याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्रिया समोर आली आहे. आज गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची जी तोडफोड करण्यात आली, याचं आम्ही समर्थन करत नाही, तसेच, ज्यांनी हल्ला केला ते आमचे कार्यकर्ते नाहीत, असं म्हणत मराठा क्रांती मोर्चानं त्यांच्यावर होणारे सर्व आरोप फेटाळले आहेत. यासोबतच, गुणरत्न सदावर्ते कायम मराठा समाजाविषयी गरळ ओकत आलेत, त्यांनी किमान आता तरी शांत राहावं, असा सल्लाही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं सदावर्तेंना देण्यात आला आहे.
मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक, अमोल जाधवराव यांनी मराठा क्रांती मोर्चाची बाजू स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "आज सकाळी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला ते मराठा क्रांती मोर्चा मुंबईमधील नाहीत. जर ते तरुण मराठा तरुण असतील आणि त्यांनी भावनेच्या भरात केलेलं हे कृत्य असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. गुणरत्न सदावर्ते हे कायम मराठा समाजा विषयी गरळ ओकत आले आहेत. त्यांनी किमान आता तरी शांत राहावं. मराठा समाज आपल्या मागण्या या सरकारकडे मागत आहेत. तर सदावर्ते हे मराठा समाजाशी काही ही वाकडं नसताना कायम क्लेशवाचक वक्तव्य का करत आहेत? असा सवाल आमच्या मनात आहे."
नेमकं काय घडलं?
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची काही लोकांकडून तोडफोड करण्यात आली आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास तीन अज्ञात व्यक्तींनी वकील गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड केली. सदावर्तेंच्या परळ येथील घराबाहेर त्यांची गाडी उभी होती. तिथेच त्यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं आहे. सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड करणारे तिनही तरुण संभाजीनगरचे असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. मंगेश साबळे, वसंत बनसोडे आणि राजू साठे असं या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सदावर्ते यांनी गाडीची तोडफोड प्रकरणासंदर्भात माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी जरांगे पाटील हेच दोषी आहेत, त्यांना अटक करावी, अशी मागणी गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.
पाहा व्हिडीओ : Gunaratna Sadavarte full pc : जरांगेंना अटक करा नाहीतर मी सुद्धा आमरण उपोषण करेन - गुणरत्न सदावर्ते
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- मनोज जरांगेंना तातडीनं अटक करा, मुसक्या बांधा, कारवाई करा अन्यथा...; गुणरत्न सदावर्तेंचा सरकारला इशारा
- सदावर्तेंच्या गाडीच्या तोडफोडीचे आरोप जरांगेंनी फेटाळून लावले; म्हणाले, मराठा समाजाला उचकवण्याचा प्रयत्न करू नयेत
- गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीची तोडफोड; तीनजण ताब्यात, हल्लेखोर मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते असल्याचा आरोप