Manoj Jarange Patil: मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही, सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंनी आझाद मैदानातून रणशिंग फुंकले
Manoj Jarange Patil: सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला.

Manoj Jarange Patil: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आज (29 ऑगस्ट) आझाद मैदानामध्ये आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे.जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला प्रारंभ करताना सरकारला सुद्धा गर्भित इशारा दिला आहे. मागण्यांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मुंबई कदापि सोडणार नाही, सरकारने मला गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही जेलमध्ये टाकले तरी जेलमध्ये सुद्धा आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी हजारो मराठा आंदोलकांसमोर दिला. जरांगे पाटील म्हणाले की, मुंबई आज मराठ्यांनी जाम करून दाखवली आहे. मात्र, सरकारनं आपल्याला सहकार्य केलं आहे. आपल्याला आंदोलनाला परवानगी दिली आहे. त्यामुळे आपण सुद्धा पोलिसांना आणि सरकारला सहकार्य करणार आहे. आझाद मैदानामध्ये आज उच्च न्यायालयाकडून एकदिवसीय आंदोलनाची परवानगी देण्यात आल्यानंतर जरांगे पाटील आंतरवाली सराटी ते मुंबई असा प्रवास करत पोहोचले आहेत. मुंबईमध्ये अभूतपूर्व गर्दी झाली असून सर्वत्र मराठ्यांचे वादळ दिसून येत आहे.
पुढील दोन तासात मुंबई मोकळी करा
आज सकाळी दहा वाजता आमरण उपोषणाला प्रारंभ केल्यानंतर जरांगे पाटील कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष होतं. यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलकांना कळकळीचा आवाहन करत कुठेही दगडफेक करू नका, पोलिसांना सहकार्य करू नका, सरकारने आपल्याला सहकार्य केलं असल्याने आपण सुद्धा सरकारला सहकार्य करत आहोत. पोलीस जी जागा देतील त्या ठिकाणी गाड्या पार्क करा आणि पुढील दोन तासात मुंबई मोकळी करा, असं आवाहन सुद्धा त्यांनी केलं. दारू पिऊन धिंगाणा करू नका, समाजाला मान खाली घालावी लागेल असे कोणतेही वर्तन करू नका. जोपर्यंत आपल्या डोक्यावर विजयी गुलाल पडत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार नसल्याचे मनोज जारंगे पाटील यांनी सांगितलं.
आंदोलनाला बट्टा लावायचा नाही
ते पुढे म्हणाले की कोण काय सांगतंय, कोण राजकीय पोळी भाजतंय, त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनात वापर करत आहे का? हे गांभीर्याने पाहून घ्या असं त्यांनी सांगितलं. आंदोलनाला बट्टा लावायचा नाही. मी मरण पत्करायला तयार आहे, पण आता मागे हटायचं नसल्याचं त्यांनी सांगितलं. जोपर्यंत आपल्याला विजय मिळत नाही तोपर्यंत आपण इथून हटणार असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या























