(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन स्लॉटचा जास्तीत जास्त वापर करा, ठाणे पालिका आयुक्तांचे आवाहन
गणपती विसर्जनासाठी ऑनलाइन स्लॉटचा जास्तीत जास्त वापर करा, ठाणे पालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन.
ठाणे : सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेशमूर्तीं विसर्जनासाठी ठाणे महापालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांची आणि विसर्जन घाटांची आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी पाहणी केली. यावेळी कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता विशेष खबरदारी घेत यंदाच्या गणेशोत्सवासाठी महापालिका यंत्रणा सज्ज असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
या पहाणीच्या वेळी महापालिका आयुक्तांनी एबीपी माझाशी विसर्जनाबाबत सविस्तर बातचीत केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा सुरु करण्यात आली आहे. ही सुविधा www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. नागरिकांनी या बुकिंग सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. तसेच महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी यावर्षीही 9 प्रभाग समितीतंर्गत फिरती विसर्जन व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांची अँटीजन चाचणी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
ठाणे महानगरपालिकेच्यावतीने प्रत्येक विसर्जन ठिकाणी अँटिजन चाचणी केंद्र उभारण्यात आले असून या ठिकाणी भाविकांनी चाचणी करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहनही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे. यासोबतच श्री गणेशाच्या विसर्जनाच्यावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी विसर्जन महाघाट, सर्व कृत्रीम तलावांच्या ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.