महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी! 10 ते 20 वयोगटात वाढताहेत कोरोना रुग्ण
Maharashtra Corona Cases : महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे. मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोनाबाधित झाले आहेत.
मुंबई : राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. यात आता महाराष्ट्रातील पालकांची चिंता वाढवणारी बातमी आहे. 10 ते 20 वयोगटात आता कोरोना रुग्ण वाढत असल्याचे डॉ तात्याराव लहाने यांनी सांगितलं आहे. मार्चमध्ये 10 ते 20 वर्ष वयोगटातील तब्बल 55 हजार कोरोनाबाधित तर गेल्या महिन्यात तब्बल साडेसहा लाख नवीन कोरोना बाधित झाल्याचं तात्याराव लहानेंनी सांगितलं आहे.
नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक
तात्याराव लहाने एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, राज्यात रुग्ण संख्या वेगाने वाढत आहे , नवीन ट्रेंड मुळे रुग्ण वाढत आहेत. नवीन ट्रेंडमध्ये बाधित करण्याची क्षमता अधिक आहे. पहिल्या स्ट्रेनच्या विषाणूमुळे चार ते पाच लोक बाधित होत होते, आता मात्र 10 पेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. आधी 50 वयाच्या वरील लोकांना कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होत होता आता मात्र 20 ते 40 च्या आतील रुग्ण अधिक आहेत. 5 ते 20 वयोगटातील मुलांना कोरोना संक्रमण होत आहे. पण यात 10 वयावरील मुलांना कोरोनाची अधिक लागण होत आहे, असं त्यांनी सांगितलं.
मुलांना कोरोना होत असला तरी घाबरण्याचं कारण नाही
मुलांना कोरोना होत असला तरी घाबरण्याचं कारण नाही. पालकांनी काळजी घेणं गरजेचं असल्याचं लहानेंनी सांगितलं. ते म्हणाले की, राज्यात कोरोना वाढत आहे. अजून लॉकडाऊनचा विचार झाला नाही, पण निर्बंध लावले जातील. पण कोरोना रुग्णसंख्या अधिक वाढली. नागरिकांनी ऐकलं नाही तर मात्र लॉकडाऊनचा विचार केला जाऊ शकतो. कोरोनाची ही दुसरी लाट आली आहे, यात वेगाने रुग्ण संख्या वाढत आहे. मुंबईत रुग्ण संख्या अधिक वाढत आहे. मुंबईत ऑफिस कर्मचारी 50 टक्के उपस्थितीचा विचार आहे. गर्दी कशी टाळता येईल यावर विचार केला जातोय, असंही त्यांनी सांगितलं.
रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रणासाठी सरकार आणि प्रशासन लॉकडाऊन आणण्याच्या तयारीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनसंदर्भात राज्यात नियोजन करा, असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. राज्यात काल 39544 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर नवीन 23600 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 2400727 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 356243 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 85.34% झाले आहे. कोरोना रुग्णसंख्येतील हा चढ- उतार सुरु असतानाच काल कोरोनामुळं दगावणाऱ्यांचा आकडाही चिंता वाढवणारा ठरला. काल दिवसभरात 227 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.