(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मुंबई, ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता : ऊर्जामंत्री
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबरला पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. परंतु हा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
मुंबई : मुंबई आणि उपनगरात सोमवारी (12 ऑक्टोबर) वीज पुरवठा खंडित झाल्याप्रकरणी राज्याचे ऊर्जमंत्री नितीन राऊत यांनी मोठा दावा केला आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असं नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केलं आहे.
सोमवार दिनांक 12.10.20 रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही.
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) October 13, 2020
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उनगरातील वीजपुरवठा 12 ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास पूर्णपणे खंडित झाला होता. या काळात अनेक महत्त्वाच्या सेवा कोलमडल्या. लोकल ट्रेन, सिग्नल यंत्रणा ठप्प झाल्या. रुग्णालय, कोर्ट तसंचं ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा मोठा फटका बसला. यानंतर टप्प्याटप्प्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला.
परंतु जवळपास अडीच ते तीन तास संपूर्ण मुंबई आणि उपनगरं अंधारात गेल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. परंतु आता ऊर्जामंत्र्यांच्या ट्वीटमुळे या प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
काही जणांकडून ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न याविषयी माध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी काही जण ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, "मुंबई, नवी मुंबई, ठाण्याला अंधारात लोटणं ही साधीसुधी बाब नाही आणि कोणी समजूही नये. काही लोक ऊर्जा खात्याला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ऊर्जा मंत्री म्हणून या बाबतीत सगळ्या बाबींची पडताळणी करणं माझी जबाबदारी आहे. आज तांत्रिक चौकशी समिती स्थापन होईल. ही समिती ऑडिट करेल. त्याचा अहवाल एक आठवड्यात येईल. महावितरणच्या अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई होणार आहे. कोणालाही सोडणार नाही."
मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांकडून चौकशीचे आदेश वीज पुरवठा खंडित झालेल्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. तसंच या घटनेची पुनरावृत्ती होणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. तर दुसरीकडे या घटनेची चौकशी करुन दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं नितीन राऊत यांनी सांगितलं होतं.
संबंधित बातम्या
संपूर्ण मुंबईची 'बत्ती' काही काळासाठी 'गुल'
मुंबईसह महानगरात वीज खंडित, मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल, तातडीने चौकशीचे आदेश
अडीच तासांच्या ब्रेकनंतर मुंबई आणि उपनगरातील वीज पुरवठा पूर्वपदावर!
Mumbai Power Cut | Nitin Raut PC | मुंबईतील वीज खंडित प्रकरणी चौकशी करणार : ऊर्जामंत्री नितीन राऊत