अडीच तासांच्या ब्रेकनंतर मुंबई आणि उपनगरातील वीज पुरवठा पूर्वपदावर!
वीज पुरवठा खंडित झाल्याने वेगाने धावणाऱ्या मुंबईला आज करकचून ब्रेक लागला. मात्र अडीच तासांनी तांत्रिक बिघाड दुरुस्त झाल्यानंतर मुंबई आणि उपनगर हळूहळू पूर्वपदावर येत आहेत
मुंबई : मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील वीज पुरवठा सुमारे अडीच तासांनी हळूहळू पूर्वपदावर येत आहे. दक्षिण मुंबई वरळी, लालबाग, माझगावसह आणि पश्चिम उपनगर, आणि पूर्व उपनगरातील नाहूर, भांडुप, मुलुंड, घाटकोपर इथला वीजपुरवठा सुरु झाला आहे. याशिवाय नवी मुंबईतील बेलापूर, खारघर, पनवेल, नेरुळ या भागातील वीजही परतली आहे. याशिवाय तिन्ही मार्गावरील लोकल सेवा, सिग्नल यंत्रणाही पूर्ववत झाली आहे. तसंच शासकीय कार्यलयांमधील वीजप्रवाहही पूर्वपदावर आला आहे. दरम्यान अभियंते आणि कर्मचारी युद्धपातळीवर काम करत असून पुढील तासाभरात वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी नागपुरातील पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई आणि एमएमआर रिजनमधील वीज पुरवठा खंडित झाल्याचा सर्वात मोठा फटका लोकल सेवा, रुग्णालयांना बसला. अनेक प्रवासी ट्रेनमध्येच अडकले. तर रुग्णालयात कोविड रुग्ण असल्याने वीज पुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्याचं आव्हान होतं. परंतु हा तांत्रिक बिघाड मोठा असल्याने तो दुरुस्त करण्यासाठी सुमारे दोन तास लागले. त्यामुळे आता मुंबई आणि उपनगरं हळूहळू पूर्वपदावर येत आहेत.
लोकल सेवा पूर्वपदावर दोन-अडीच तासांच्या खोळंब्यानंतर मुंबई लोकलचा वीज पुरवठा पूर्ववत झाला आहे.मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील रेल्वे पुन्हा सुरु झाल्या आहेत. सुरुवातीला हार्बर मार्गावरील वाहतूक सुरु झाली. त्यानंतर मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरु करण्यात आली. वीजप्रवाह खंडित झाल्याने अनेक प्रवासी रेल्वेमध्येच अडकले होते.
तांत्रिक बिघाड नेमका कशामुळे? महापारेषणच्या कळवा- पडघा GIS केंद्रात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने ठाणे, कल्याण, पालघर आणि नवी मुंबईमधील वीज खंडित झाली. याचा cascade effect मुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील वीज देखील खंडित झाली, अशी माहिती महावितरणने दिली. तसंच महापारेषण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी युद्धपातळीवर काम करत आहेत. दीड ते दोन तासात वीज पूर्ववत सुरु होईल, असं महावितरणने सांगितलं होतं.
ऊर्जामंत्र्यांकडून चौकशीचे आदेश दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी तांत्रिक बिघाडाची चौकशी होईल, अशी ग्वाही दिली. रुग्णालय आणि रेल्वे सुरु करणं हे आमचं प्राधान्य आहे. मात्र तांत्रिक बिघाड नेमका कसा झाला, ही चूक नेमकी कशामुळे झाली याची चौकशी केली जाईल, असं राऊत यांनी सांगितलं.
एमएमआर वीज खंडित प्रकरणी मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याशी चर्चा केली. मुंबई तसंच मुंबई महानगर क्षेत्रातील वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत अशा सूचना दिल्या. रुग्णालयांना वीज पुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरु राहावी जेणेकरुन अडचण होणार नाही याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या. या सर्व काळात वीज पुरवठा खंडित असल्याने इतर काही अपघात होणार नाहीत यादृष्टीने नियंत्रण कक्ष, अग्निशमन दल यांनी सतर्क राहावे आणि तात्काळ मदत करावी असेही त्यांनी मुख्य सचिव व मंत्रालय नियंत्रण कक्षास सांगितलं. उपनगरीय रेल्वेला याचा फटका बसला असून तिथेही प्रवाशांच्या मदतीला तात्काळ धावून जाण्याबाबत रेल्वे प्रशासनाशी समन्वय साधावा असेही त्यांनी निर्देश दिले आहेत.
Mumbai Power cut | मुंबई उच्च न्यायालयातील वीजपुरवठा दोन तासानंतर सुरळीत