Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या RTI ला एकाच दिवसात उत्तर, उदय सामंत म्हणतात...
Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबत मागितलेल्या माहितीला काही तासांतच उत्तर दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. तर, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विरोधकांचे आक्षेप फेटाळून लावले आहेत.
Maharashtra Politics: वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाच्या (Vedanta Foxconn Project) दिरंगाईबाबत माहिती मागवणारा माहिती अधिकारातंर्गत अर्ज (RTI) दाखल करण्यात आला. या अर्जाला एमआयडीसीने (MIDC) एकाच दिवसात उत्तर दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. ज्या दिवशी हा अर्ज दाखल झाला. त्याच दिवशी RTI ला उत्तर देण्यात आल्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यावर उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी एका दिवसात माहिती मिळाली म्हणून जे टीका करतायेत त्यांच मला हसायला येत असल्याचे म्हटले. माहिती खरी असेल तर तात्काळ द्यायला हरकत काय आहे, असा सवालही त्यांनी केला.
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्पाबाबतची माहिती मागणारा अर्ज RTI अंतर्गत संतोष गावडे यांनी दाखल केला होता. संतोष गावडे यांनी हा अर्ज महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) 31 ऑक्टोबर रोजी दाखल केला होता. या अर्जाला MIDC ने 31 ऑक्टोबर रोजीच उत्तर दिले. माहिती अधिकारातंर्गत दाखल करण्यात आलेल्या अर्जाला काही तासांत उत्तर मिळत असल्याने त्याच्या 'टायमिंग'बाबत उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. याबाबत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी टीकेला अर्थ नसल्याचे म्हटले आहे. सामंत यांनी म्हटले की, माहितीच्या अधिकारात एका दिवसात माहिती मिळाली म्हणून जे टीका करतायेत त्यांच मला हसायला येत आहे. जर माहिती खरी असेल तर तात्काळ द्यायला हरकत काय आहे असा सवालही त्यांनी केला. ज्यांना पुन्हा एकदा खात्री करायची असेल तर त्यांनी पुन्हा एकदा RTI अंतर्गत अर्ज दाखल करावा असा सल्लाही त्यांनी दिला.
महाविकास आघाडीच्या काळातील उद्योगांबाबत श्वेतपत्रिका काढणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा विषय संपला असल्याचा त्यांनी स्पष्ट केले. सत्ता गेली, मंत्रीपद गेले, खुर्ची गेली, मुख्यमंत्रीपद गेलं म्हणून ही चिडचिड असून त्यातूनच हे आरोप सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला.
काँग्रेसची सडकून टीका
वेदांता-फॉक्सकॉन प्रकरणी एका व्यक्तीने माहिती अधिकाराखाली अर्ज केला व त्या व्यक्तिला विशेष जलतगती सेवा देत त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत माहिती देण्यात आली. फडणवीस हे पुन्हा पुन्हा खोटे बोलण्याचा अश्लाघ्य प्रकार करत असून आरटीआय मधूनही त्यांनी तेच केले असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. आपल्या हातून झालेल्या चुका लपवण्यासाठी ही धडपड सुरु आहे. शिंदे-फडणवीस सरकार चुका लपवण्याचे काम करत आहे. फडणवीसांच्या काळात 16 लाख कोटींचे करार झाले होते पण 16 रुपयांचीही गुंतवणूकही आली नसल्याचा हल्लाबोल काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केला.