Bhagat Singh Koshyari : '...तेव्हा मराठी माणूस आठवला नाही का? भाजप आमदार नितेश राणेंकडून कोश्यारींची पाठराखण
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोणतेही चुकीचे वक्तव्य केले नसल्याचे सांगत भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांची पाठराखण केली आहे.
Bhagat Singh Koshyari : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्यावरून राजकीय वादंग निर्माण झाला असताना दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. राज्यपालांनी कोणाचाही अपमान केला नसल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे. राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना श्रीमंत केले असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांनी मुंबईबाबत वक्तव्य केल्यानंतर विरोधकांकडून राज्यपालांवर टीकेची झोड उठवली जात आहे. तर, सत्ताधारी शिंदे गटानेही नाराजी व्यक्त केली आहे. दुसरीकडे भाजपचे आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांनी काहीही चुकीचे म्हटले नसल्याचे सांगितले. त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले असल्याचे राणे यांनी सांगितले. विरोधकांवर निशाणा साधताना राणे यांनी म्हटले की, राज्यपालांविरोधात बोलणाऱ्यांनी किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले? किती मराठी तरुणांना मुंबई महापालिकेचे कंत्राट दिले? तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहिजे असतात असा टोलाही राणे यांनी लगावला.
मा. राज्यपालांकडून कोणाचा ही अपमान झालेला नाही..
— nitesh rane (@NiteshNRane) July 30, 2022
त्यांनी फक्त त्या-त्या समाजाला त्यांच्या योगदानाचे श्रेय दिले आहे..
त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांनी..किती मराठी माणसांना मोठे किंवा श्रीमंत केले?किती मराठी तरुणांना bmc चे contract दिले?तेव्हा तुम्हाला शाह आणि अग्रवाल पाहीजे असतात..
राज्यपालांच्या वक्तव्यावर टीका होत असताना भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र, भाजप आमदार नितेश राणे यांनी राज्यपालांची पाठराखण केल्याने आता भाजपविरोधात इतर पक्ष असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राज्यपाल कोश्यारी यांनी काय म्हटले?
गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे. शुक्रवारी, मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मुंबई, ठाणेच्या विकासात गुजराती, मारवाडी समाजाचे मोठं योगदान आहे.
राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे
राज्यपालांनी केलेले वक्तव्य हे राज्याचे अपमान करणारे आहे. मुंबईच्या उभारणीत सगळ्याच समाजाचा वाटा आहे. मात्र, त्यातही मोठा वाटा मराठी माणसांचा आहे. एखाद्या समाजाच्या कार्यक्रमाला गेल्यानंतर त्या समाजाने पैसा काढला की मुंबईत काही राहणार नाही असे वक्तव्य म्हणजे राज्यपालांचा मुंबईबाबतचा अभ्यास कमी आहे, याचे द्योतक असल्याचे केसरकर यांनी म्हटले.
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर
राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली. गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे. यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला असल्याची टीका सावंत यांनी केली आहे.
महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी म्हटलं आहे की, महाराष्ट्र आणि मुंबईतील माणूस कर्तबगार आणि सक्षम आहे. मराठी माणसाच्या जीवावर अनेक राज्य पोसल्या जातात. आम्ही चटणी भाकर खाऊन पोट भरून इतरांना पोसणारी इमानदार माणसे आहोत. आपण मराठी माणसाचा अपमान केलाय महाराष्ट्राची लवकरात लवकर माफी मागा, असं आमदार मिटकरींनी म्हटलं आहे.