Pankaja Munde : मला दबावतंत्र करायचं नाही, मोठा नेता नेहमीच त्याग करतो : पंकजा मुंडे
दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतल्यानंतर आज पंकजा मुंडे यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. मला दबावतंत्र करायचं नाही
मुंबई : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये प्रीतम मुंडे यांना स्थान न मिळाल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात आहे. तसंच मंत्रिपद न मिळाल्याने मुंडे समर्थक देखील नाराज झाले आहेत. मुंडे समर्थकांनी याचा निषेध म्हणून राजीनामे द्यायलाही सुरु केले आहेत. या पार्श्वभूमीवर काल त्यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठांनी भेट घेतली. त्यानंतर आज त्या मुंबईत परतल्या. यावेळी त्यांना भेटण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले.
यावेळी कार्यकर्त्यांशी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला पदाची आणि खुर्चीची लालसा नाही. राजीनामा देणाऱ्या कार्यकर्त्याचे राजीनामे नामंजूर केले. माझ्या डोळ्यात पाणी पाहून तुम्ही राजीनामे दिले, तुमच्या डोळ्यात पाणी पाहून मी कशी जगू, असं त्या म्हणाल्या. मला दबावतंत्र करायचं नाही. मी काल दिल्लीला गेले होते. संघटनेच्या कामासाठी गेले होते. मला कुणीही झापलं नाही. अत्यंत सन्मानाची वागणूक पंतप्रधान मोदी, अध्यक्ष नड्डा यांच्याकडून मिळाली. कार्यकर्त्यांनी नाराजी दूर कराल असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. मोठा नेता नेहमीच त्याग करतो असंही त्या म्हणाल्या. जोपर्यंत शक्य आहे तोवर धर्मयुध्द टाळायचा प्रयत्न करणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. मी कुणालाही घाबरत नाही, निर्भिड राजकारणाचे संस्कार माझ्यावर आहेत, असं त्या म्हणाल्या. पक्षाने मला खूप दिलंय, पक्षाने दिलेलं मी लक्षात ठेवते. जे दिलं नाही ते तुम्ही लक्षात ठेवा. मला ज्या दिवशी वाटेल इथे राम नाही, त्या दिवशी बघू, असंही त्या म्हणाल्या.
मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे बीडमध्ये पडसाद; प्रीतम मुंडेंना डावलल्याने राजीनामा सत्र सुरु
मी प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. मुंडे साहेबांनी मला राजकारणात आणलं कारण मला वंचितांची सेवा करायला मिळायला हवी. गोपीनाथ मुंडेंनी तळागाळातील लोकांसाठी काम केलं. मला राजकारणात आणताना त्यांनी मोठा विचार मनात घेऊन आणलं. मला मंत्री करा, माझ्या बहिणीला मंत्री करा यासाठी आम्हाला राजकारणात आणलं नाही. कोणतंही पद मिळवण्यासाठी मी राजकारणात आले नाही. हे आपले संस्कार नाहीत. लोकांची कामं करण्यासाठी मी राजकारणात आले. माझा परिवार सर्व कार्यकर्त्यांचा परिवार आहे. मी कार्यकर्त्यांचे ऋण कधीच फेडू शकणार नाही, असं त्या म्हणाल्या.
मंत्रिमंडळात विस्ताराबाबत बोलताना गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीने पंकजा मुंडे गहिवरल्या, म्हणाल्या...
भागवत कराड यांच्या मंत्रिपदाबाबत बोलताना त्या म्हणाल्या की, मी माझ्या समाजाच्या मंत्र्यांला अपमानित का करु? लोकांची काम करण्यासाठी मी राजकारणात आहे, असं त्या म्हणाल्या. निवडणुकीत अनेक लोक पराभूत झाले. कराड यांचं वय 65 आहे. ते आपल्या समाजाचे आहेत मी त्यांचा अपमान करणार नाही, असं त्या म्हणाल्या.