Mumbai Local Train: मुंबईत अवकाळी पावसामुळे तिन्ही मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत; ट्रेनची वाहतूक अर्धा तास उशीराने, कामावर जाणाऱ्या प्रवाशांचे हाल
Mumbai Local Update : पनवेल - सीएसटी गाड्या आर्धा तास उशीराने धावत आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे मार्गात अडथळे आल्याने वेळापत्रकात बदल झाला आहे.
Mumbai Local Update : मुंबईसह उपनगरात होत असलेल्या मुसाळधार पावसामुळे (Mumbai Rain Update) मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत (Mumbai Local Update) झाली आहे. पावसाचा मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम झाला आहे. पनवेल - सीएसटी गाड्या आर्धा तास उशीराने धावत आहे. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रेल्वे मार्गात अडथळे आल्याने वेळापत्रकात बदल झाला आहे.
शहरात झालेल्या पावसामुळे लोकल मंदावली आहे. याचा फटका मध्य रेल्वेला बसला असून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गांवर परिणाम झाला असून लोकल ट्रेन 15 ते 20 मिनीटं उशिराने धावत आहेत. मध्य रेल्वेवरील कल्याण आणि हार्बर मार्गावर रे रोड, सेंडहर्स्ट रोड स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल काही काळ थांबून मग पुढे गेल्या. रेल्वे स्थानकात प्रवाशांची गर्दी झाली आहे. मेन लाईन, हार्बर मार्गावर देखील पाऊस असून तरीही सर्व मार्गावर ट्रेन्स सुरु असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. सीएसएमटी ते ठाणे आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या सेक्शन मध्ये लोकल ट्रेन्स उशिराने धावत आहेत. सध्या मेन लाईनवरील लोकल 15 ते 20 मिनिटे, हार्बर लाईनवरील 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील लोकल देखील 10 ते 15 मिनिटे उशिराने धावत आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी सकाळी वाहतुकीचा खोळंबा
तांत्रिक बिघाडामुळे मंगळवारी सकाळी वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. आज सकाळपासूनच मध्य रेल्वेच्या लोकल ट्रेन्स उशीराने धावत आहेत. अनेक गाड्या 15 ते 30 मिनिटे उशीराने धावत असल्याची माहिती आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत कामावर जाण्यासाठी निघालेल्या चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
मुंबईसह ठाणे, कल्याण, पालघरमध्येही पावसाची हजेरी
मुंबईसह ठाणे जिल्ह्यातही पावसाने हजेरी लावली आहे. अंधेरी परिसरात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली दहिसर या सर्व परिसरामध्ये पाऊस सुरू आहे. दिवा, डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर तसेच ग्रामीण परिसरात मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे कामावर निघालेल्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेती पिकांचं देखील मोठं नुकसान झालं होतं. त्यानंतर आता पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. पालघर जिल्ह्यातील पालघर डहाणू भागात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे रब्बी तसेच बागायती शेतीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तरी या भागातील वीट भट्टी व्यावसायिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजासह विट भट्टी व्यवसायिक ही चिंतेत आहे.