Maharashtra-Karnataka Border Dispute | कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश घोषित करा : मुख्यमंत्री
'कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी त्यांनी कर्नाटक सरकारवर हल्लाबोल केला
मुंबई : 'कर्नाटकव्याप्त वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करा', कानडी सरकारवर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे वक्तव्य केलं आहे. 'महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प' या शासकीय पुस्तकाचं आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, उद्योग मंत्री विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, "हा कर्नाटक व्याप्त महाराष्ट्र आहे. कर्नाटक सरकार उर्मटपणे वागत आहे." "हे प्रकरण कोर्टात असताना ज्या पद्धतीने आधी बेळगावला उपराजधानी बनवली, मग नामांतर केलं हा कोर्टाचा अपमान नाही का?" असा प्रश्न त्यांनी विचारला. ते पुढे म्हणाले की, "एकतर हे सरकार तुमच्या पाठीशी आहे. या कार्यक्रमानंतर शरद पवार यांच्यासोबत बैठक आहे. कर्नाटक सरकार कायद्याचा विचार करत नाही. हा विषय तेवढ्यापुरते बोलायचं असतो. मुख्यमंत्री कोणीही असो मराठींवर अन्याय करतात. हा भाग महाराष्ट्रात आणायचा आहे."
"रहेंगे तो महाराष्ट्र में, नही तो जेल में" तसेच "बेळगाव, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे" या सीमावासियांच्या घोषणांत मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, खासदार @PawarSpeaks यांच्या हस्ते आज "महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद: संघर्ष आणि संकल्प" या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. pic.twitter.com/CWgoy3MWPd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 27, 2021
'भाग केंद्रशासित झाला पाहिजे' वादग्रस्त भाग केंद्रशासित प्रदेश करण्याबाबत बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की "एक दिलाने लढलो तर प्रश्न सुटेल. पवारसाहेबांनी यावर काम केलं आहे. हा प्रश्न कोर्टात असेपर्यंत हा भाग केंद्रशासित का करत नाही? कोर्टात बेलगाम वागत आहे. हा भाग केंद्रशासित झाला पाहिजे, यात कर्नाटक सरकारची मस्ती चालू देणार नाही, असं आपण कोर्टात सांगितलं पाहिजे.
'हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया' "मराठी एकीकरण समिती तुटली कशी? मराठीदुहीचा शाप आहे. अनुभवाचे फटके पडले आता मराठी अस्मिता एकत्र आणत नाही तोपर्यंत प्रश्न सुटणार नाही. संघराज्याचं स्वप्न आहे. भाषावार प्रांतरचना झाली पण महाराष्ट्रातील मराठी माणसं आपल्यापासून दूर केली. अत्याचार झाला तर आम्ही तोडून मोडून टाकणार. मराठी आमदार निवडून आले पाहिजे अशी माझी इच्छा आहे.मराठी महापौर निवडून आले, पण त्यांनी काही केलं तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करतात. मातृभाषेसाठी लढला तर राजद्रोह? आजपासून नवीन सुरुवात करुया. मतभेद झाले तर गाडून टाका. जोपर्यंत हा भाग महाराष्ट्रात येत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, ही प्रतिज्ञा घेऊया," असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.