Parambir Singh letter | महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा; अनिल देशमुखांवरील आरोपांप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी व्हावी- राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सदर प्रकरणी ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली.

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप करत मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं. ज्यामुळं आता राज्याच्या राजकीय पटलावर बऱ्याच घडामोडींना वेग आला आहे.
गृहमंत्र्यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली, असा दावा परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केला. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं आढळल्याप्रकरणी एनआयएने एपीआय सचिन वाझे यांना अटक केली. ज्यानंतर परमबीर सिंह यांचीही मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आली. याच धर्तीवर आता त्यांनी लिहिलेल्या पत्रानं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत.
राजकीय वर्तुळातूनही आता यावर प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सदर प्रकरणी ट्विट करत उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली. ही घटना पाहता महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमाच लागला आहे, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
'मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे. गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
राज ठाकरे यांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासमवेत या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचीही मागणी केली आहे. असं झाल्यास यामध्ये आणखीही काही नावं पुढे येण्याची बाब नाकारता येत नाही. तेव्हा आता या प्रकरणाला पुढे कोणतं वळण मिळतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ह्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं पत्र अत्यंत धक्कदायक आहे. महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे.
— Raj Thackeray (@RajThackeray) March 20, 2021
गृहमंत्री अनिल देशमुख ह्यांनी तात्काळ राजीनामा द्यायलाच हवा आणि ह्या प्रकरणात त्यांची उच्चस्तरीय चौकशी देखील व्हायला हवी.
दरम्यान, आपल्यावर करण्यात आलेले आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी फेटळून लावले आहेत. परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीटरवरुन दिली.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
