Cabinet Meeting: सणासुदीच्या सुट्ट्यांनंतर बऱ्याच दिवसांनी आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; या महत्वाच्या निर्णयाची शक्यता
सणासुदीच्या उत्सवात गेल्या काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet News) होऊ शकली नव्हती. अखेर आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडणार आहे.
Maharashtra Cabinet Meeting: शिंदे फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची (Shinde Fadnavis) आज बैठक होणार आहे. सणासुदीच्या उत्सवात गेल्या काही दिवसात ही मंत्रिमंडळाची बैठक (Cabinet News) होऊ शकली नव्हती. अखेर आज ही बैठक सकाळच्या सत्रात पार पडणार आहे. या बैठकीत राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीमुळे आलेला पूर, जमिनीला भेगा पडणं,भूस्खलन होणं, दरड कोसळणं यासारख्या घटनांमध्ये मदत करण्यासाठी राज्याचं नवीन पुनर्वसन धोरण येणार आहे.
गेल्या महिन्यात ऑगस्टमध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. गोविंदांना मदतीच्या निर्णयासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवासाची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती.
बैठकीत या निर्णयाला मान्यता मिळण्याची शक्यता
राज्याच्या नवीन पुनर्वसन धोरणाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळण्याची शक्यता आहे. पूर येणे, दरड कोसळणे, चक्रीवादळे, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक आपत्तींना महाराष्ट्र दरवर्षी तोंड देत असते. अशा नागरिकांच्या पुनर्वसनाचे कोणतेही धोरण नाही. त्यामुळे पुनवर्सन धोरण निश्चित करण्यात आले आहे. यामुळे संभाव्य जिवीतहानी मोठ्या प्रमाणात टाळता येणार आहे. राज्याच्या या नव्या पुनर्वसन धोरणामध्ये नवे निकष आणि नियमातील सुधारणा यांचा समावेश असणार आहे. राज्यात एखाद्या जिल्ह्यात आपत्ती ओढवल्यानंतर देण्यात येणारी मदत वितरीत करण्याचे अधिकार नविन पुनर्वसन धोरणात ठरवण्यात येणार आहे. नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधितांना मदतीची रक्कम देण्यासाठी लागणार विलंब याचा देखील विचार या नव्या धोरणात केला जाणार आहे. हे धोरण ठरविण्यासाठी समितीची स्थापना केली होती.
बैठकीत शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादाची चर्चेची शक्यता
आज सकाळी 10 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. बैठकीत शिंदे गट आणि शिवसेनेच्या वादाची चर्चा होऊ शकते. येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या कायदा सुव्यवस्था प्रश्नावरही कॅबिनेटमध्ये चर्चा होऊ शकते. तसेच राज्यात वाढत्या लम्पी रोगाच्या प्रादुर्भावाबाबत आणि त्यावर उपाययोजनांबाबत देखील आजच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. शिवाय अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीबाबत आढावा घेऊन ही मदत लवकरात लवकर कशी दिली जाईल यावर देखील चर्चा या बैठकीत होणे अपेक्षित आहे.
आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबादच्या दौऱ्यावर जाणार आहेत. कधीकाळी ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरेंची सभा गाजली होती, तिथेच मुख्यमंत्र्यांची सभा आज होणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या