मोठी बातमी: कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय
Maharashtra Cabinet Meeting: आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यामध्ये अदानी समूहाच्यादृष्टीने सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

Maharashtra Cabinet Meeting: राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला (Dharavi Redevelopment) देण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. कुर्ल्यातील जवळपास 8.05 हेक्टर जागा धारावी पुनर्विकासाला देण्यात आली आहे. धारावी प्रकल्पाच्या नावाखाली अदानी समूहाला (Adani Group) ही जागा देऊ नये, यासाठी खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह स्थानिकांनी आंदोलन केले होते. मात्र, या विरोधाला डावलून राज्य सरकारने मदर डेअरीची जाग अदानी समूहाला देऊ केली आहे. त्यामुळे आता विरोधक यावरुन पुन्हा आक्रमक होण्याची शक्यता आहे. (Mother Dairy land parcel in Kurla)
धारावी पुनर्विकास प्रकल्पावेळी धारावीतील अनेक कुटुंबाचे स्थलांतर करावे लागेल. त्यादृष्टीने मदर डेअरीची जागा महत्त्वाची मानली जात होती. ही जागा आपल्याला मिळावी, अशी मागणी अदानी समूहाकडून करण्यात आली होती. ही मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. धारावीतील लोकांच्या स्थलांतरासाठी मदर डेअरी, देवनार डम्पिंग ग्राऊंड, मालाडमधील भूखंडाची मागणी करण्यात आली होती. मात्र, विरोधकांकडून अदानी समूहाला या जागा देण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र, राज्य सरकारने मदर डेअरीचा तब्बल साडेआठ हेक्टरचा भूखंड अदानी समूहाला दिला आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेण्यात आले?
1. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना. आयोगासाठी पदनिर्मिती, जागा व अनुषंगिक खर्चास मान्यता. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार (आदिवासी विकास विभाग)
2. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातील अटी, शर्तीमध्ये सुधारणांना मान्यता ( महसूल विभाग)
3. राज्य कामगार विमा महामंडळाच्या दोनशे खाटांच्या विमा कामगार रुग्णालय उभारणीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मौजे करोडी येथील सहा हेक्टर गायरान जमीन. याशिवाय बिबवेवाडी- पुणे, अहिल्यानगर, सांगली अमरावती, बल्लारपूर- चंद्रपूर, सिन्नर- नाशिक, बारामती, सातारा आणि पनवेल येथील रुग्णालयांना जमीन देण्यास तत्वतः मान्यता
(महसूल विभाग)
4. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळास पथकराच्या सवलतीसाठी भरपाई मिळणार. मुंबई प्रवेशद्वाराच्या पाच पथकर स्थानकावर सवलत दिल्यामुळे महामंडळास द्यावी लागणारी भरपाई.
(सार्वजनिक बांधकाम विभाग)
अदानींना जमीन देताना कुठलंही नियमबाह्य काम नाही: गिरीश महाजन
धारावी पुनर्वसनात कुठलंही नियमबाह्य काम केलं जाणार नाही. जागा कमी पडत असेल तर शासनाने दिली असेल. त्यात चुकीचं काय आहे? उद्धव ठाकरेंनी धारावीसाठी तर काही केलं नाही. विरोधकांना दुसरा काही कामधंदा नाही, असे गिरीश महाजनांनी म्हटले.
आणखी वाचा
















