LIDAR Survey | मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी लिडार सर्वे सुरू
मुंबई नागपूर बुलेट ट्रेनसाठी लिडार (LiDAR ) सर्वे सुरू करण्यात आला आहे. हा सर्वे तीन चार महिन्यात पूर्ण होणार आहे.

मुंबई : मुंबई नागपूर हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी लिडार ( LiDAR ) सर्वे आजपासून सुरू करण्यात आला आहे. नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड हा सर्वे करते आहे. या प्रकल्पाचा डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट (DPR) बनवण्यासाठी असा सर्वे करणे आवश्यक असते. हा मार्ग एकूण 736 किमीचा आहे, ज्यामध्ये नागपूर, खाप्रि डेपो, वर्धा, पुलगाव, करंजाड, मालेगाव जहांगीर, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी, शहापूर आणि मुंबई अशी स्थानके असतील.
लिडार सर्वेमध्ये एका विमानाला लिडार आणि फोटो व्हिडीओ घेणारे सेन्सर्स लावलेले असतात. हे विमान हवेतूनच प्रस्तावित मार्गाचा ग्राउंड सर्वे पूर्ण करते. LiDAR म्हणजे लाईट डिटेक्शन अँड रेंजिंग सर्वे, जो हवेतून केला जातो. यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या आजूबाजूच्या 150 मीटर पर्यंतच्या प्रदेशाचे छायाचित्र घेतले जाते. त्यासाठी 100 मेगापिक्सल क्षमता असलेला कॅमेरा वापरला जातो. त्यानंतर त्याचा एक 3d टोपोग्राफिकल मॅप तयार केला जातो, ज्यामध्ये आजूबाजूच्या प्रदेशात असलेल्या झाडे, डोंगर, इमारती अश्या सर्व गोष्टी लांबी, रुंदी, उंची नुसार बघता येतात.
यामुळे रेल्वे मार्गच्या निर्माणात मोठे साहाय्य होते, नेहमीच्या पद्धतीने हा सर्वे केल्यास एक वर्षापेक्षा जास्त काळ लागतो. मात्र, लिडार सर्वेमुळे हे काम केवळ 3 ते 4 महिन्यात पूर्ण होते. आज मुंबई नागपूर या हाय स्पीड रेल कॉरिडॉरसाठी अश्या पद्धतीचा पहिला सर्वे करण्यात आला. येत्या 3 ते 4 महिन्यात हा सर्वे पूर्ण करून या प्रकल्पासाठी डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करण्यात येईल. एनएचएसआरसीएल मुंबई अहमदाबादनंतर नवीन 7 मार्गांचे सर्वेक्षण करते आहे, त्यात मुंबई नागपूर हा मार्ग देखील प्रस्तावित आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
